‘केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र’ ही भाजपची घोषणा संपुष्टात?, जाहिरातबाजी करून शिंदे गटाचा फडणवीसांच्या वर्मावरच घाव!


मुंबईः ‘केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र’ ही भाजपची २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील घोषणा संपुष्टात आली की काय? अशा जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेला निमित्त ठरली ती शिवसेनेच्या शिंदे गटाने आज मंगळवारी राज्यातील अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेली भलीमोठी जाहिरात! ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा शिर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडवणीसांपेक्षा जास्तीची पसंती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. अशी जाहिरातबाजी करून आधीच ऐनवेळी मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिल्यामुळे अनिच्छेने उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावरच घाव घातल्याची चर्चाही सुरू झाली आहे. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास मुख्यमंत्री मीच असेन असेच एकनाथ शिंदे यांनी या जाहिरातीच्या माध्यमातून सांगून टाकल्याचेही बोलले जात आहे.

 शिवसेनेच्या शिंदे गटाने आज महाराष्ट्रातीला बहुतांश वृत्तपत्रात भली मोठी पानभर जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत आगामी निवडणुकांसंदर्भातील एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंनाच जास्त पसंती दिल्याचा दावा आकडेवारीसह करण्यात आला आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या सर्वेक्षणानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील २६.१ टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रिपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के जनतेला मुख्यमंत्रिपदी पहायचे आहे, असा दावा या सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक सरस आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या शिंदे गटाने या जाहिरातून केला आहे. ही जाहिरात आणि प्रसिद्ध करण्यात आलेली आकडेवारी म्हणजे शिंदे गटाकडून देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावरच घाव घालण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पामुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले. मतदान सर्वेक्षणानुसार भारतीय जनता पक्षाला ३०.२ टक्के आणि शिवसेनेला १६.२ टक्के जनतेने कौल दिला आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील ४६.४ टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेत आणण्यास इच्छूक आहे, असा दावा या जाहिरातीत करण्यात आला आहे.

भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न?

भाजपने २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी जाहिरातबाजी करत प्रचार केला होता. परंतु आता शिंदे गटाने मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे हेच अधिक लोकप्रिय असल्याचा दावा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्यातील ३०.२ टक्के जनतेने भाजपला आणि १६.२ टक्के जनतेने शिवसेनाच्या शिंदे गटाला कौल दिला आहे, असा दावा या जाहिरात करून आगामी निवडणूक भाजपला शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय जिंकता येणार नाही, असा स्पष्ट संदेश देऊन शिंदे गटाने भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

‘शिंदे गटाला भाजपची नव्हे तर भाजपला शिंदे गटाची गरज’

शिंदे गटाच्या या जाहिरातीवरून महाराष्ट्रात राजकीय चर्चा आणि तर्कवितर्क लढवले जात असतानाच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिरातीचा मतीतार्थ सांगितला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून भाजपला संदेश देण्यात आला आहे. आता भाजपला शिंदे गटाची गरज आहे, शिंदे गटाला भाजपची नाही. भाजपची ताकद कमी झाली आहे. शिंदेंची ताकद वाढली आहे, हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने मुख्यंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील तीव्र संघर्ष समोर आला आहे, असे रोहित पवार यांनी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अजून निवडणुकीला वर्ष शिल्लक आहे. मग शिवसेनेकडून आताच जाहिरात का देण्यात आली?  राज्यात पुढील तीन महिन्यांमध्ये निवडणूक होणार आहे का? गेल्या दहा दिवसांत शिंदे गट आणि भाजपमधील लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपावरून संघर्ष समोर आला आहे. त्यामुळे शिंदे गटाने ही जाहिरात देऊन भाजपच्या बड्या नेत्यांना एक प्रकारचा संदेशच दिला आहे, असे पवार म्हणाले.

राज्यात देवेंद्र ही घोषणा मागे पडली काय?, बावनकुळे म्हणतात…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना या जाहिरातीच्या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारले. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा मागे पडली काय? नरेंद्र-देवेंद्रऐवजी मोदी-शिंदे हे बदलेले समीकरण आवडले का? असे प्रश्न बावनकुळेंना पत्रकारांनी विचारले. त्यावर एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. या सरकारचे प्रमुख आहेत. तर नरेंद्र मोदी हे देशाचे प्रमुख आहेत. त्या आशयाने जाहिरातीत तसे लिहिले असावे, असे बावनकुळे म्हणाले.

 या राज्यातील जनतेने दोनवेळा देवेंद्र फडणवीस यांना पसंती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. आधीच्या सरकारमध्येही त्यांनी चांगले काम केले होते. मुळात कोण मोठे, कोण लहान हे शिवसेना-भाजपमध्ये महत्वाचे नाही, अशी सारवासारवही बावनकुळे यांनी केली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!