मुंबईः मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आता संपली आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे म्हणजेच मान्सूनचे आज रविवारी (११ जून) आगमन झाले आहे. सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
नैऋत्य मान्सूनचे आज ११ जूनला महाराष्ट्रात आगमन झाले आहे. मान्सूनने दक्षिण कोकणाचा काही भाग, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनने संपूर्ण गोवा, कर्नाटकचा भाग व्यापला असून तामीळनाडू आणि आंध्रप्रदेशचा काही भागही व्यापला आहे. रत्नागिरी, शिमोगा, हसन, धरमपुरी, श्रीहरीकोटा, दुभरीमध्ये मान्सून येऊन धडकला आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
यंदा मान्सून केरळमध्येच उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही लांबणीवर पडले होते. महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस मान्सूनच्या आगमनाची वाट पहात होता. अखेर आज राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मान्सून रत्नागिरीपर्यंत पोहोचला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
राज्यात पुढील चार-पाच दिवसात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील चार- पाच दिवस राज्याच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. मान्सून केरळमध्ये सात दिवस उशीरा म्हणजेच ८ जून रोजी दाखल झाला. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होतो आणि महाराष्ट्रात तो ७ जूनपर्यंत दाखल होत असतो. मात्र अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे यंदा मान्सूनचे उशिराने आगमन झाले आहे.