जळगावः महाराष्ट्रातील नव्या पिढीची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या आडनावारून सध्या जोरदार वाद सुरू आहे. या वादात काहीजण गौतमी पाटीलचे समर्थन करत आहेत, तर काहीजण तिच्या विरोधात आहेत. सोशल मीडियावर हा वाद पेटत चाललेला असतानाच गौतमी पाटीलला आडनाव बदल अन्यथा महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी धमकी देण्यावरून मराठा संघटनांमध्येच फूट पडल्याचे समोर आले आहे. गौतमीच्या आडनावावरून मराठा समाजाची बदनामी होते, हे आपणाला पटत नसल्याचे सांगत जळगावच्या मराठा सेवा संघाने आम्ही गौतमी पाटीलच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले आहे.
गौतमी पाटीलच्या आडनावावरून राज्यात सध्या मोठा वाद सुरू आहे. मराठा संघटनांचे समन्वयक असल्याचे सांगणाऱ्या राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी गौतमीला दिलेल्या एका इशाऱ्यावरून या वादाला सुरूवात झाली आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करत आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला होता. मराठ्यांचे पाटील हे आडनाव खराब करण्याचे गौतमी पाटीलचे षडयंत्र असल्याचा आरोपही जऱ्हाड पाटील यांनी केला होता.
जऱ्हाड पाटील यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर गौतमी पाटीलच्या आडनावावरून पेटलेल्या या वादामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापल असताना आता मराठा संघटनांमध्ये याच मुद्द्यावरू फूट पडल्याचे समोर आले आहे. काही मराठा संघटना गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत.
गौतमी पाटीलने सादर केलेल्या नृत्यावर केवळ आडनावावरून आक्षेप घेण्यात आल्याचा निषेध जळगावमधील मराठा सेवा संघाने केला आहे. गौतमीच्या आडनावामुळे मराठा समाजाची बदनामी होते, हे आपणाला पटत नसून आपण गौतमीच्या पाठीशी आहोत, असे जळगाव येथील मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.
जेव्हा माधुरी दीक्षित नृत्य करायची, तेव्हा कोणत्याही दीक्षितांनी तिला विरोध केला नाही. तर गौतमीच्या पाटील आडनावरून आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. जर आक्षेपच घ्यायचा असेल, विरोध करायचा असेल तर मराठा समाजाच्या मुलांनी तिचे कार्यक्रम पहायला जाऊ नये. तिच्या कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मात्र तिला धमकी देणे अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचे आहे, असे सुरेंद्र पाटील यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.
एक मराठा संघटना गौतमी पाटीलच्या आडनावावर आक्षेप घेत तिचे महाराष्ट्रातील कार्यक्रम हाणून पाडण्याची धमकी देत असतानाच दुसऱ्या मराठा संघटनेने म्हणजेच मराठा सेवा संघाने गौतमी पाटीलला दिलेल्या धमकीचा जाहीर निषेध करत तिच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतल्यामुळे गौतमी पाटीलच्या मुद्यावरून मराठा संघटनांमध्येच दोन गट पडल्याचे पहायला मिळत आहे.
गौतमीने ‘पाटील’ हे आडनाव का म्हणून बदलावे?
गौतमी पाटील धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या गावात लहानाची मोठी झाली. गौतमी पाटीलच्या आडनावावरून वाद निर्माण झाल्यानंतर तिच्या गावातील लोक तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. गौतमीने आडनाव बदलण्यासारखे कुठलेही काम केले नाही. ज्या कामामुळे तिचे संपूर्ण देशात नाव झाले, ते नाव तिने का म्हणून बदलावे?, असा सवाल शिंदखेडाच्या ग्रामस्थांनी केला आहे.
गौतमी पाटीलपेक्षा जगात अनेक सुंदर लोक आहेत. मात्र त्या सुंदर लोकांना पाहण्यासाठी लोक का गर्दी करत नाहीत? गौतमी पाटील सुंदर आहे म्हणून नव्हे तर तिची कला पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. यात आक्षेपार्ह किंवा समाजाची बदनामी करण्यासारखे काहीही नाही. गौतमी पाटील अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अनेकांना खूपत असल्याचे शिंदखेडाच्या ग्रामस्थांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.