छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): महावितरण या सरकारी मालकीच्या वीज वितरण कंपनीच्या ३ कोटी वीज ग्राहकांपैकी फक्त ५० टक्के ग्राहकांचेच अचूक व योग्य बिलिंग होत आहे. १०० टक्के वीज ग्राहकांची अचूक बिलिंग झाल्यास महावितरण कंपनी जगातील सर्वात जास्त महसूल घेणारी कंपनी होईल, असे महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी म्हटले आहे.
वीजग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासह महसूलवाढीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सुरळीत वीजपुरवठा, अचूक बिलिंग व वापरलेल्या प्रत्येक युनिटची वीजबिल वसुली केली तरच महावितरण प्रगतीपथावर जाईल. त्यासाठी महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ताकसांडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने आयोजित तांत्रिक कामगारांची कार्यशाळा व ईद मिलन समारंभात ते बोलत होते.
भारतरत्न मौलाना आझाद संशोधन केंद्रात झालेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे होते प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर, अधीक्षक अभियंते प्रकाश जमधडे, प्रवीण दरोली, संजय सरग, आर. पी. चव्हाण, कार्यकारी अभियंते प्रेमसिंग राजपूत, महेश पाटील, दीपक सोनोने, योगेश देशपांडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड, सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन, कार्यकारी अध्यक्ष आर. पी. थोरात, उपसरचिटणीस कैलास गौरकर, राधेशाम शडमल्लू, श्रावण कोळनूरकर, शिरीष इंगोले, अजिज पठाण, ताराचंद कोल्हेमामा, उदय मदूरे, बी. डी. पाटील, संतोष वाघमारे, जाफर पठाण यांची मंचावर उपस्थिती होती.
महावितरणची पायाभूत यंत्रणा, थकबाकीची स्थिती, वीज वितरण क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य यावर ताकसांडे यांनी सविस्तर विवेचन केले. महावितरण ही सर्वार्थाने देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. राज्यातील तीन कोटी ग्राहकांना वीजपुरवठा करताना महावितरणचे कर्मचारी चांगले काम करत आहेत. विशेषतः कोरोनाच्या जागतिक संकटात तसेच चक्रीवादळातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे, असे ताकसांडे म्हणाले.
महावितरणवर वेगवेगळ्या बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. तसेच विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे जवळपास ६० ते ७० हजार कोटींची थकबाकी आहे. यामुळे महावितरण आर्थिक संकटात आहे. या संकटातून महावितरणला बाहेर काढण्यासाठी ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली झालीच पाहिजे, तसेच ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आखाव्या लागतील, असे ताकसांडे म्हणाले.
ताकसांडे हे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असतात. तांत्रिक कामगारांचे प्रश्न त्यात यंत्रचालकांची ॲनॉमली, मराठवाड्यातील यंत्रचलाकांचा बंद झालेला अतिकालीन कामाचा मोबदला, प्रधान तंत्रज्ञ, मुख्य तंत्रज्ञ यांना महापारेषणप्रमाणे यंत्रचालक संवर्गात जाण्याचा मार्ग खुला करणे, प्रधान तंत्रज्ञांना पेट्रोल भत्ता १३ लिटर देणे, २०० उपकेंद्रांचा एम.पी.आर. देऊन कायम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आदी मागण्यांवर दि. २४ मे रोजी मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे संचालक संचालन यांनी मान्य केले असे जहिरोद्दीन यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी कैलास गौरकर, राधेशाम शडमल्लू, उदय मदूरे, शिरीष इंगोले यांची भाषणे झाली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावण कोळनूरकर यांनी केले तर आभार आर. पी. थोरात यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झोन, मंडळ, विभागीय पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.