तुळजापूरः साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या तुळजा भवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लागू केलेल्या ड्रेस कोडवरून वाद निर्माण होताच अवघ्या काही तासांतच मंदिर प्रशासनाने यू-टर्न घेतला असून तोकड्या कपड्यांवरील निर्बंध मागे घेतले आहेत.
तुळजा भवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंदिर संस्थानच्या वतीने ड्रेसकोडची नियमावली जाहीर करण्यात आली होती. अंगप्रदर्शक, उत्तेजक, असभ्य आणि अशोभनीय वस्त्रधारी, तसेच हाफ पँन्ट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले होते. भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान ठेवा, असेही या फलकावर म्हटले होते.
मंदिर परिसरात हे फलक झळकल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मंदिर प्रशासनाने अवघ्या काही तासांतच यू-टर्न घेत मंदिरात प्रवेशासाठी कुठलाही ड्रेसकोड लागू करण्यात आलेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
तुळजा भवानी देवीच्या दर्शासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. दर्शनासाठी कोणत्या स्वरुपाचे कपडे परिधान करावे, याबाबत यापूर्वी कोणताही नियम अथवा निर्बंध नव्हते. मात्र १८ मे रोजी ड्रेसकोडबाबतचे फलक मंदिर परिसरात ठिकठिकाणी झळकले आणि नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर तहसीलदार तथा मंदिराचे व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी एक जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.
‘मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेदारी आणि भाविक तसेच भक्तांना कळवण्यात येते की, श्री तुळजा भवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. तरी सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी,’ असे या जाहीर प्रगटनात म्हटले आहे.
मंदिराची शालीनता कायम राहावी, यासाठी भाविकांना कपड्यांबाबत असा तोंडी निर्णय घेतला गेला होता. रेकॉर्डवर असा निर्णय नसल्याचे लक्षात आल्यानंतर कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे प्रगटन आपण काढले आहे, असे तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक सौदगर तांदळे यांनी म्हटले आहे.