छत्रपती संभाजीनगरः ज्यांचे वय डोळे मारण्याचे, ते डोळे मारतात. आजकाल डोळे मारण्याचा सीझन सुरू आहे. ज्यांनी लहानपणी डोळे मारले नसतील ते आता डोळे मारू लागले आहेत, अशी टिप्पणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलबाबत विचारलेल्या प्रश्नावर केली.
महाराष्ट्रभर सध्या चर्चा आहे ती नृत्यांगना गौतमी पाटीलची. राज्यात अनेक ठिकाणी यात्रा, वाढदिवसानिमित्त तिच्या डान्स शोचे आयोजन केले जाते. पुण्यातील मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने एका बैलासमोर डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुण्यात पत्रकारांनी विचारले असता ‘तुला काय वाईट वाटले. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला काय त्रास होतो?,’ अशी मिश्कील टिप्पणी केली होती.
अजित पवारांच्या या टिप्पणीवर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना प्रतिक्रिया विचारली असता, ज्याचे वय डोळे मारण्याचे ते डोळे मारतात. आजकाल डोळे मारण्याचा सीझन सुरू आहे. ज्यांचे वय आहे डोळे मारण्याचे ते डोळे मारतात किंवा ज्यांनी लहानपणी डोळे मारले नसतील ते आता डोळे मारू लागले आहेत. अजित पवार जे काही बोलतात त्याला महत्व आहे. कारण ते राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
गौतमी पाटीलचा डान्स कार्यक्रमाबद्दल विचारले असता, सिल्लोड कृषी महोत्सवात मी त्यांचा कार्यक्रम बघितला आहे. तेव्हा खूप लोक होते. आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम ठेवू आणि त्यावेळी अजित पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रणही देऊ, असे सत्तार म्हणाले.
गौतमी पाटीलचा डान्स तुम्ही पाहता का? असे विचारले असता सत्तार म्हणाले की, मी सिल्लोडला त्यांचा कार्यक्रम पाहिला होता. मी लावण्या अनेकदा पाहिल्या आहेत. आपल्या राज्यात लावणी ही संस्कृती आहे. मी कधी डान्सबारमध्ये गेलो नाही. परंतु लावण्या पाहतो. कारण या नृत्यांगनांचा डोक्यापासून पायापर्यंत मराठी संस्कृतीला शोभेल असाच वेष असतो. आपल्या संस्कृतीला शोभेल अशाच लावण्या असतात, असेही सत्तार म्हणाले.