
मुंबई: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहर व जिल्ह्यात बनावट सह्या आणि बनावट आदेशांचा वापर करून सरकारी जमिनींचे व्यवहार करण्याच्या अनेक तक्रारी समोर येत असल्याने या प्रकरणांचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
आ. प्रविण दरेकर यांनी छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातील सरकारी जमिनींच्या गैरव्यवहार प्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. आ. सतेज पाटील, शिवाजीराव गर्जे, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले. त्यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिले.
छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या बनावट सह्या-शिक्क्यांचा वापर करून सरकारी जमिनीबाबत बनावट आदेश तयार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास देण्यात येणार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी जमिनींबाबत बनावट आदेश तयार करून त्या खासगी नावावर करण्याचा प्रयत्न झाल्याच्या गंभीर तक्रारी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
एसआयटी स्थापन झाल्यानंतर नागरिकांना निश्चित कालावधी देऊन सरकारी जमिनींबाबत झालेल्या कथित गैरव्यवहारांबाबत तक्रारी सादर करण्याचे आवाहन करण्यात येईल. प्राप्त तक्रारींची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी जमिनींच्या वाटपाचे बनावट आदेश तयार करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संभाव्य सहभागाबाबतही चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाईबाबत सभागृहाला माहिती दिली जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
