महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणणारः उच्च शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत ग्वाही


मुंबई:  राज्यातील महाविद्यालयांमध्ये विविध नावांनी आकारल्या जाणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने पावले उचलली असून शुल्क नियामक प्राधिकरणाकडून आता ट्युशन फीबरोबरच इतर शुल्कांवरही नियंत्रण ठेवले जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील पी. के. कोटेचा महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींकडून जादा शुल्क आकारल्याबाबत विधानसभा सदस्य अस्लम शेख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना पाटील बोलत होते.

जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या प्रकरणी चौकशी करून भुसावळ येथील पी. के. कोटेचा महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम परत घेतली असून त्यावर दंडही आकारण्यात आला आहे. हा दंड विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे, असे पाटील म्हणाले.

काही महाविद्यालयांकडून पॉवर चार्जिंग, कॉम्प्युटर लॅब आदी नावाने शुल्क आकारले जात असल्याची बाब चौकशीत समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या शुल्कांवर नियंत्रण ठेवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले.

कला, वाणिज्य व विज्ञान या अभ्यासक्रमांची ‘ट्युशन फी’ अत्यंत नाममात्र असून ठराविक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शुल्क सवलतीचीही तरतूद आहे. मात्र अनेक महाविद्यालयांकडून ‘अदर फी’ किंवा इतर शुल्क आकारले जात असल्याने आता अतिरिक्त शुल्कांवरही नियमन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले .

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!