
नांदेड येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च असे दोन दिवस सायन्स कॉलेजच्या सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल मैदानावर उभारण्यात आलेल्या राजा ढाले साहित्यनगरीत २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. आज रात्री पँथर पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित ‘भयंकराच्या दरवाजात कोण?’ या नृतनाट्याने या संमेलनाची सुरूवात होत आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित भाग…
–लोकनाथ यशवंत, अध्यक्ष, २० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, नांदेड.
मी एक कवी असून कविता हे माझे सर्वस्व आहे. कविता माझ्या जीवनाचा श्वास आहे. जगातील सर्व माणसांचे चांगले दिवस येवोत, या भावनेने मी नेहमी कविता आविष्कारतो. परिस्थितीनुसारच कविता सुचतात. त्यात माझे स्वतःचे काहीच नाही. सगळे सामाजिक परिस्थितीवर अवलंबून असते. एखादा विषय डोक्यात आला की सतत मनात घोळत असतो. त्या विषयाचे सतत मनन-चिंतन सुरू असते. माझ्या प्रत्येक कवितेचे विषय वास्तव आणि जिवंत आहेत. नव्हे माझ्या स्वभावाशी निगडित आहेत. कवितेतले विषय, माझ्या अनुभवातून आलेले आहेत. मानवी स्वभावच मला कविता देत असतो. जगात घडणाऱ्या अमानवी घटना हा माझ्या कवितेचा पाया आहे. एखादी माणुसकीला लाजवेल अशी घटना घडली की, माझ्या कवितेला सुरूवात होते. अगोदर ती मेंदूत फिरते आणि मग त्यातून माझी कविता जन्म घेते. मेंदूत प्रथम कथा येते, मग तिची कविता होते. माझी कविता एका अर्थाने लोकांशी साधलेला संवाद आहे. माझी कविता संयत विद्रोही आहे. विचार हा तिचा स्थायीभाव आहे.
ज्यांच्या मनात माणसाविषयी कणव असते असे मन समाजात घडणाऱ्या प्रत्येक विषमतावादी घटनेची नोंद घेत असते. संवेदनशील मनाने घेतलेल्या नोंदी, साहित्य कवितेच्या रूपाने समोर येतात. त्यातून जनसामान्याचे जगणे सुसह्य व्हावे अशी भावना व चिंतन असतेच. माणसाच्या जगण्याचा स्तर सतत उंचावत जावा म्हणून व्यवस्थेविरूद्ध जो-जो बंड करतो, तो विद्रोहीच असतो. कारण आपले साहित्य आपली प्रतिक्रिया असते. माझी कविता ही समाजाविषयीची माझी प्रथम प्रतिक्रियाच आहे. विद्रोही साहित्याची निर्मिती थांबलेली नाही, परंतु सध्या जे लिहिले जातेय, ते बेस्ट व उत्तम आहे हे सिद्ध होण्यासाठी काळ जावा लागतो. जसा काळ-वेळ पुढे सरकत जाईल, काळाच्या कसोटीवर हे साहित्य बेस्ट म्हणून समोर येईलच. उत्तम ठरण्याची प्रक्रिया दीर्घकालीन आहे. तिला शॉर्टकट नाही. पक्षीसुद्धा जगण्यासाठी विद्रोह करतात. पक्ष्यासारखा स्वच्छ विद्रोह माणसांनी करावा. विद्रोह हा तयारीनिशी हवा.
‘धर्मसंस्कारामुळे आपण ‘आदमखोर’ झालो. धर्म माणसासाठी झाला, पण माणूस धर्मासाठी होत आहे. अपयशी माणूस नेहमी धर्मावर भाष्य करतो. देव, धर्म व अध्यात्म या बोगस मान्यता असून त्या अघोरी आहेत. मला धर्माच्या पलीकडचा माणूस हवा आहे आणि तो मी साकारण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या गर्दीत माणसाचे जीवनच गायब झाले. धर्मसंकल्पनाबाबत माझी भूमिका नकाराधिष्ठित आहे.’
व्यवस्थेचे रूप उघडे करणारे साहित्य मला अभिप्रेत आहे. प्रत्येक कालखंडात एक व्यवस्था कार्यरत असते. ती त्या काळाला घडवित असते. किंवा गिळंकृत करीत असते. या व्यवस्थेचे पुरस्कर्ते ती तशीच ठेवण्यात धन्यता मानतात. अनादिकाळापासून व्यवस्था सामान्यांना गुलाम करीत आलेली आहे. हाडामासाच्या माणसाला बहिष्कृत करणारी व्यवस्था कार्यरत असते. मी ‘कबीर’ या कवितेत म्हटले की,
‘कबीर,
आपण जगण्यासाठी संपूर्ण नालायक आहोत
हे या व्यवस्थेने सिद्ध केले आहे पूर्वीच.’
व्यवस्था कशी बदलते, हे सामान्यांच्या लक्षात येत नाही. शोषणाचे नवनवीन रूप व्यवस्था धारण करते.
‘ज्या व्यवस्थेविरूद्ध.
सोबत्यांना घेऊन सर्वशक्तिनिशी लढण्यास निघालो
कालांतराने लक्षात आले
सगळे सोबती माझ्यासाठी नवी व्यवस्था झाले आहेत.’
वर्तमान व्यवस्था मुखवट्याचे रूप धारण करते. अशा नागड्या व्यवस्थेचा आरसा कवी-साहित्यिकांनी उजागर केला पाहिजे. व्यवस्था आपल्यावर हावी होता कामा नये याचे भान आवश्यक ठरते. व्यवस्था परिवर्तन साहित्याचे प्रयोजन आहे.
कुठलीही क्रांती ही परिवर्तन असते. ती तशीच आवश्यक असते. पण तिच्या सोबत नवी क्रांतिकारी व्यवस्थाही आणावी लागते. ती आणायला दीर्घ काळ लागतो. दरम्यान क्रांतीचे जनक कालबाह्य होतात आणि ज्यांच्यावर हे उत्तरदायित्व येते, त्यांच्यात तेवढी कुवत नसल्याने बदलाची प्रक्रिया हळूहळू मंदावते. चलाख व्यवस्था तर शत्रूच्या ठायीच मित्राचा भास उभा करते आणि मित्राकडून शत्रू म्हणून बोट वळविले जाईल, असा कट करते. यातून मित्रवत प्रेषितांचे सामान्यांच्या हातून खून व्हावेत आणि वृद्धापकाळी निधन व्हावे, असे विरोधाभास निर्माण होतात.
कैदीच एकमेकावर नजर ठेवून असतात. जेलरला धास्ती कसली? शत्रू जेव्हा मित्र होतो आणि मग आपल्या हातून मित्राचाच खून होतो. पुढे जेव्हा केव्हा ही चूक उमगते तेव्हा चुकीची भरपाई म्हणून आम्ही हुताम्याची स्मारके बांधतो आणि विशेष म्हणजे आमची दिशाभूल करणारेच पुन्हा तिथे भक्त म्हणून हजर होतात. हीच इतिहासाची शोकांतिका आणि माझी व जनसामान्यांची वर्तमान व्यथा आहे. प्रगतीच्या भाकरीमागे खेड्यातून शहरात आलो आणि अस्पृश्यता नष्ट होण्याच्या मोबदल्यात आम्ही झोपडपट्ट्या पदरात घेतल्या, असे व्यवस्थेचे स्वरूप आहे.
‘बाबासाहेबांप्रती असलेला जनसामान्यांचा आदर आणि जिव्हाळा यांचा लाभ उचलणारे नवेच बहुरूपी नवनव्या नावाखाली समूहाला वापरू लागले. क्षणोक्षणी त्यांच्या नावाचा वापर करून स्वार्थ साधणारे हे नादान लोक वारसा हक्काच्या उसन्या तेजाने तळपू लागले. याचा परिणाम एकच झाला की, शस्त्राची भाषा बोलणारा दलितांचा लढा पावती पुस्तकातून पुढे सरकू लागला. या पावती पुस्तकांनी समाजाचे नेत्यागणिक तुकडे केले आणि तुकड्यागणिक जयंती पुण्यातिथीच्या पावत्या फाटू लागल्या. ज्या एकीसाठी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याची कुर्बानी केली त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या व्हाव्यात यापेक्षा त्यांचा अन्य अपमान तो कोणता?’
मला मानवजातीचे सुख, संपन्न जीवन महत्त्वाचे वाटते. त्यामुळे माझ्या कवितेचा केंद्रबिंदू माणूस राहिला आहे. व्यवस्था परिवर्तन हे तिचे ध्येय व उद्दिष्ट आहे. मला परिवर्तन अपेक्षित आहे. माणूस हा सर्वश्रेष्ठ मानणारे साहित्य हवे. माणूस हा निसर्गाचा आहे. निसर्ग हा माणसासाठी आहे. पण व्यवस्थेने त्याला निसर्गापासून हिरावून घेतले. माणूस हा सर्वांचा निर्मिक म्हणजे तो अलौकिक अर्थाने नाही, तर लौकिक अर्थाने आहे. एका हाकेत लाखो माणसांचा आक्रोश आणि साध्या चालण्यातही करोडो पावलांचा समूह हवा. पलायनवादी माणसे नकोत. वस्ती जळायला लागली की पळून जाऊ नये. माणूस आदर्शाची पायमल्ली करतो, कधी कधी आपलेच आदर्श आपल्यावर उलटतात. मुका मार बसल्यासारखे कोणाला सांगताही येत नाही. माणुसकीला प्रदूषित करणारी माणसे कमरेला झाडू बांधून अस्पृश्यतेचे प्रदर्शनही करतात.
माझी कविता चळवळीची आहे. पुढारी हरामखोर निघाले तर मग आपण खपवून कसे घेतले? असा प्रश्न चळवळीसंदर्भात महत्त्वाचा ठरतो. इतरांना पोथीनिष्ठ म्हणता म्हणता आमच्या डोक्यावर पोथ्या आल्या, याचा विचार व्हायला पाहिजे. शेवटी हेच झाले की, ‘सारे आतल्या तुरूंगातून बाहेरच्या तुरूंगात आले’ फक्त नाव नवे असले तरी रीत जुनीच आहे म्हणून तुरूंगातून सुटल्यावर पुढारी गालात हसला. अशिक्षित, दरिद्री अशा नवजागृत समाजात नेतृत्त्वाला किती महत्त्व असते, हे खुद्द बाबासाहेबांच्या उदाहरणावरून सिद्ध झाले होते. केवळ यामुळे आपल्यानंतर आपल्या समूहाचे काय होईल ही त्यांना चिंता होती.
‘महतप्रयासाने इथवर आणलेला काफिला पुढे न्या, पण मागे खेचू नका’ असे बाबासाहेबांनी कळवळून म्हटले होते. पण नंतरच्या नेतृत्त्वाने या काफिल्याचे तोंडच फिरवले. बाबासाहेबांप्रती असलेला जनसामान्यांचा आदर आणि जिव्हाळा यांचा लाभ उचलणारे नवेच बहुरूपी नवनव्या नावाखाली समूहाला वापरू लागले. क्षणोक्षणी त्यांच्या नावाचा वापर करून स्वार्थ साधणारे हे नादान लोक वारसा हक्काच्या उसन्या तेजाने तळपू लागले. याचा परिणाम एकच झाला की, शस्त्राची भाषा बोलणारा दलितांचा लढा पावती पुस्तकातून पुढे सरकू लागला. या पावती पुस्तकांनी समाजाचे नेत्यागणिक तुकडे केले आणि तुकड्यागणिक जयंती पुण्यातिथीच्या पावत्या फाटू लागल्या.
ज्या एकीसाठी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याची कुर्बानी केली त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या व्हाव्यात यापेक्षा त्यांचा अन्य अपमान तो कोणता? ‘आणि शेवटी काय झाले’ हे सांगणे मी माझे कर्तव्य समजले. आणि यातून हिशेब तपासणीचा आणि स्वपरीक्षणाचा अहवाल मांडला. शत्रूला न भिणारी जनसान्यांची चळवळ ही फितुरांनाही क्षमा करीत नाही हे त्या चळवळीने जसे सिद्ध केले पाहिजे तसेच त्या साहित्यानेही विद्रोहाचे बोल बोलताना स्वपरीक्षणात्मक लिहिलेही पाहिजे. जी चळवळ स्वपरीक्षण नाकारते ती आंधळी होऊन दिशाहीन होते हा इतिहास आहे. याचे भान चळवळीने ठेवायला पाहिजे.
माणसाचा मृत्यू अटळ आहे. तरीही माणूस मुखवटे धारण करून जगतो, वास्तवतेकडे दुर्लक्ष करतो. भोगवादी जीवन जगतो. विषमतेला खतपाणी घालतो. आपल्या विश्वातच जगत असतो. मानव्याला बाजूला सारतो. फडतूस जीवन जगतो. ताओ, माओ, मार्क्स, आर्कमिडिज, आईनस्टाईन, राईट बंधू, ग्राहम बेल, मार्कोनी आदी सारेच काळाच्या आड गेले. तुम्ही-आम्ही कोण? याची जाणीव करून देण्यासाठी आणि माणूस म्हणून जगण्याची अपेक्षा बाळगून क्षणभंगुरतेविषयी भाष्य करतो. गर्दीत एकदाच मिळालेले जीवन आहे, तरीही या शेवटच्या वळणावर स्वतःला शोधले पाहिजे. याची जाणीव करून देण्यासाठी माझी कविता धडपडत असते.
जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही या न्यायाने साहित्य आविष्कृत होणे अगत्याचे आहे. ऐतिहासिक अवलोकन करीत शोषणाचा आणि विषमतेचा आढावा ऐतिहासिक जाणिवा दृग्गोचर करतात. अनादी काळापासून एक प्रस्थापित काठी सतत आमच्या पाठीवर उगारून आहे. तळागाळातील माणसे कोंडवाड्यासारखे जीवन अव्याहतपणे जगले आणि जगत आहेत. हिटलरनेही अगणित माणसांना कोंडून संपवले. त्याला इतिहासाने काही केले नाही. पेशवाईत तर उच्च निचतेचे पेव फुटले होते. पेशवाई निरंकुश सत्तेचा नीच नमुना आहे. गॅस चेंबरमध्ये माणसे कोंडून मारल्या गेली. भोळ्या भाबड्यांवर अणुबॉम्ब टाकल्या गेले. या घटना तर अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. इतिहासात घडलेल्या घटनांचा निषेध साहित्य कृतीतून नोंदवल्या गेला पाहिजे. काही इतिहास हा छळवणुकीचा आहे. इतिहासाने दिलेले हरलेपण, दास्य, सांस्कृतिक गुलामी विसरता येत नाही अशा बाबींचे अंतर्मुखपणे विश्लेषण करावेच लागेल.
‘वर्तमान व्यवस्था मुखवट्याचे रूप धारण करते. अशा नागड्या व्यवस्थेचा आरसा कवी-साहित्यिकांनी उजागर केला पाहिजे. व्यवस्था आपल्यावर हावी होता कामा नये याचे भान आवश्यक ठरते. व्यवस्था परिवर्तन साहित्याचे प्रयोजन आहे.’
सामाजिक अधिष्ठान हे साहित्यकृतींचे लेणे आहे. माझी कविता हे लेणे लेवूनच आविष्कृत झालेली आहे. सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. अनेक सामाजिक प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतात. भारतीय समाजव्यवस्था वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करीत जातिव्यवस्थेच्या रूपाने प्रत्येकांच्या मनामनात वास करीत आहे. विचार सत्ये सांगणे आणि कोंडमारा व्यक्त करणे हे अनुस्यूत आहे. अस्पृश्यतेने भारतीय समाजव्यवस्था विकलांग केली असून खैरलांजीसारखे प्रकार मानवतेला लांच्छनास्पद आहेत. बहुरुप्याचे सोंग करून ‘डेकोला’ प्रवृत्तीचे दर्शन समाजव्यवस्था घडवित असते. नामांतराचा लढा सामाजिक अभिसरणाचा लढा होता. मागितल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. वर्तमान सामाजिक वास्तव अस्वस्थ करणारे आहे. सामाजिक वास्तवाला साहित्यातून आविष्कृत करणे हे साहित्याला सामाजिकतेचे बळ देणारे ठरते.
अश्लाघ्य धर्मविषयक संकल्पनांना माझा नकार आहे. चळवळीला खिळखिळ्या करणाऱ्या आणि मानवतेला नकार देणाऱ्या बाबींचा निषेधच केला पाहिजे. धर्मनैतिकतेचा अनाठायी वापर करणाऱ्या अंधश्रद्धात्मक प्रवृत्तींना मान्यता देता कामा नये. माणूस कधीही एकत्र येऊ नयेत, अशी धर्मव्यवस्था असते. धर्माने भारतीय समाजव्यवस्था नासवली. धर्मसंस्कृतीने अज्ञान, निर्धनता व सर्व प्रकारची अभावग्रस्तता हजारो वर्षापासून सांभाळलेली आहे. धर्माच्या नावाने होणाऱ्या दंगली असमानतेचे व दहशतीचे वातावरण निर्माण करतात. धर्मसंस्कारामुळे आपण ‘आदमखोर’ झालो, धर्म माणसासाठी झाला, पण माणूस धर्मासाठी होत आहे. अपयशी माणूस नेहमी धर्मावर भाष्य करतो. देव, धर्म व अध्यात्म या बोगस मान्यता असून त्या अघोरी आहेत. मला धर्माच्या पलीकडचा माणूस हवा आहे आणि तो मी साकारण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या गर्दीत माणसाचे जीवनच गायब झाले. धर्मसंकल्पनाबाबत माझी भूमिका नकाराधिष्ठित आहे.
साहित्य केवळ क्रांतीचा उद्घोष करणारे नसावे तर क्रांतदर्शी, क्रांतिसन्मुख, क्रांतिप्रवण व परिवर्तनशील असावे. याची सम्यक काळजी माझ्या काव्याने घेतलेली आहे. क्रांतीला फार मोठा इतिहास आहे. क्रांतीची ज्वाला काव्यातून प्रथम उमटली याची इतिहासाची पाने साक्ष देतात. क्रांतीला झाकोळण्याचा अनुचित प्रयत्न परिवर्तनाला विरोध करणारे करतात. कारण त्यांना अश्लाघ्य परंपरा कायम राखायच्या असतात. “क्रांतीचं नाव कसेही, कुठेही, केव्हाही घेऊ नकोस म्हणून, हिजड्यांना मिशा शोभत नाही रे!” अशी माझी क्रांतिसन्मुख भूमिका आहे.
‘वर्तमान काळात परंपरंचे आदर्श मोडकळीस निघत असून जागतिकीकरणामुळे उफराटा झालेला आढळतो. ज्याला आदर्श म्हणावेत ते मोडकळीस आले आहेत. कोणते आदर्श स्वीकारावे हे भेडसावत आहे. तथाकथित भामटे आदर्शाचे नवीन विचार सांगतच नाहीत. जातिधर्माच्या संकल्पना गोंजारत आदर्शाचा बकवास करतात. आदर्शाना कफनात गुंडाळून, वाचाळपणाला ऊत आलेला आहे. अपप्रवृत्तींनाच आदर्शाची मान्यता मिळत असून व्यवस्था तर आदर्शाच्या नावाखाली मानेवरून सुरी फिरवते.’
शहरे-महानगरे विस्तारित होताना अगणित प्रश्नही निर्माण झालेत. औद्योगिकरण व कारखानदारी यामुळे प्रदूषणाला निमंत्रण मिळतेच पण माणसाचेही अधःपतन होते. धुराळ्याने शहरे काळी असली तरी कारखान्याच्या आवारात निश्चितच हिरवळ असते. शहरात पुतळ्यांची संख्या वाढू लागली. पुतळे अपप्रवृत्तीचे लोक तोडतातही. शहराबद्दलचे माझे अनुभव जिवंत आहेत. “क्रुद्ध समूहातील एक संथ पावलांनी समोर आला आणि अल्पश्रमाने त्याने माझे दिशादर्शक बोटच तेवढे तोडले” यातून मला व्यापक अर्थ सूचित करावयाचा आहे.
माणसाला सजग करणारे साहित्य निर्मिती आपल्याला उभी करणारी ठरते. कारण आपण आडवे झाल्यावरच ते उभे होतात. ‘मुक्यांनी चौकाचौकात भाषण द्यावे बेंबीच्या देठापासून ओरडत-ओरडत आणि मीही क्रांतीचा बेत आखावा आपल्या खोकातुल्य मेंदूत‘ आपणही स्वतःला ओळखून उभं झालंच पाहिजे. आता फार झाले. तुमच्या इमारतीचा पाया आमचा आहे. आम्ही तो कधीही हालवू शकतो ही जाणीव फार महत्त्वाची आहे.
विज्ञान हे माणसाच्या प्रगतीसाठी जागतिकीकरणाची प्रक्रिया संपूर्ण जग एकत्र आणण्याची आहे. जागतिकीकरण लादल्या गेलेली व्यवस्था असून त्यात सामान्यांची गळचेपी होताना आढळते. काळासोबत जगण्याचे निकष बदलले असून सगुण- दुर्गुणात परावर्तित झालेले आहेत. माणसे विज्ञानयुगात व जागतिकीकरणात वरवरच्या प्रगतीच्या डोल्यारात मृत्युपंथाला लागलेली आहेत. दलिदरांनी सुंदर जीवनाचे वाटोळे करून टाकले. कोंडमारा होणाऱ्या जागतिकीकरणाच्या या गलिच्छ पद्धतीमुळे माणसे उंदरासारखी एकमेकांवर धावू लागली आणि माणूस स्वतःलाच पारखा झाला. विज्ञानाने प्रचंड प्रगती साधली, तरीही विज्ञानावर काहींचा विश्वासच नाही. तरीही विज्ञाननिष्ठ असलेच पाहिजे विज्ञान हा लहानपणापासूनचा माझा आवडीचा विषय. म्हणून कवितेतून तो अधूनमधून झळकत असतो. वैज्ञानिक भूमिका स्वीकारणे महत्त्वाचे कारण ते वास्तव आहे.
वर्तमान काळात परंपरंचे आदर्श मोडकळीस निघत असून जागतिकीकरणामुळे उफराटा झालेला आढळतो. ज्याला आदर्श म्हणावेत ते मोडकळीस आले आहेत. कोणते आदर्श स्वीकारावे हे भेडसावत आहे. तथाकथित भामटे आदर्शाचे नवीन विचार सांगतच नाहीत. जातिधर्माच्या संकल्पना गोंजारत आदर्शाचा बकवास करतात. आदर्शाना कफनात गुंडाळून, वाचाळपणाला ऊत आलेला आहे. अपप्रवृत्तींनाच आदर्शाची मान्यता मिळत असून व्यवस्था तर आदर्शाच्या नावाखाली मानेवरून सुरी फिरवते. “आपलेच संस्कार उलटलेत आपल्यावर, दाखविता येत नाहीत हा मुका मार” अशा स्थितीत मुलांपुढे कोणते आदर्श ठेवावेत, हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे मुलाला जगण्यासाठी मुखवटा धारण करायला कवितेतून सांगितले आहे. कारण हे मुखवट्याचे जग आहे. आदर्श हे संस्कारक्षम असावेत.
वैश्विक जाणिवेच्या अग्रभागी माणूस असून मानवमुक्ती हे त्याचे प्रयोजन मानल्या जाते. मानवजातीच्या अस्तित्त्वाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. याच मूल्यांना जागतिक पातळीवर महत्त्व आहे. ग्लोबल व्हिलेजमधल्या नागवलेल्या माणसाचा विचार करणे काळाची गरज आहे. ‘शेवटी हावरट महासत्तेनं गिळून टाकलं जोड्या-मोज्यासहित देशाला, संपन्नतेची इस्टमन कलर स्वप्न दाखवून’ . माहिती तंत्रज्ञानाने जग जवळ आले तरीही लढाया सुरूच आहेत. मनं जुळली नाहीत अन् एकत्रही आली नाहीत. मानवाने आपल्या तिक्ष्ण बुद्धिने जी वैज्ञानिक प्रगती केली, ती माणसाला सर्वांगसुंदर करण्यासाठी. त्याचा वापर मनुष्यास संपवण्याकरिता होऊ लागला. याचा परिणाम जागतिकीकरणातून होत आहे. शेवटी माझी ‘यश’ नावाची कविता मांडतो.
‘शहर बॉम्ब वर्षावात नेस्तनाबूत झाल्यावर
तिकडच्या सैनिकाला बघताच
इकडच्या बालिकेने खूप घाणेरड्या शिव्या हासडल्या
खूपच घाणेरड्या, अतिशय गलिच्छ
एवढ्यानेही शांत झाली नाही ती
अंगावर धावूनही गेली दात ओठ खाऊन,
डोळे वटारून
शेवटी,
चिमुकलीने दगडी भिरकावला त्वेषाने
मी खुश
जिंकल्या माझ्या कविता’
मला २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन माझा जो मान सन्मान केला आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद!
