शाळा, सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये आता ५२ सेकंदांच्या ‘जन गण मन’पूर्वी ३ मिनिटे १० सेकंदांचे ‘वंदे मातरम्’ अनिवार्य!


नवी दिल्लीः केंद्र सरकारने आता शाळा, प्रत्येक सरकारी कार्यक्रम तसेच इतर अधिकृत आयोजनांमध्ये ५२ सेकंदांच्या ‘जन गण मन’ या राष्ट्रगीतापूर्वी ३ मिनिटे १० सेकंदांच्या ‘वंदे मातरम्’ च्या संपूर्ण सहा कडव्यांचे गायन किंवा वादन अनिवार्य केले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत १० पानांचा सविस्तर आदेश जारी केला आहे.

जेव्हा राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान एकत्र गायले किंवा वाजवले जातील तेव्हा ‘वंदे मातरम्’ आधी सादर केले जाईल. सर्व उपस्थित व्यक्तींना राष्ट्रगान गायले किंवा वाजवले जात असताना सावधान मुद्रेत उभे राहणे अनिवार्य असेल. पंरतु चित्रपटगृहात चित्रपट किंवा न्यूजरिलच्या वेळी वंदे मातरम् वाजवले जात असताना उभे राहणे अनिवार्य नसेल. कारण त्यामुळे लोकांना त्रास होऊ शकतो किंवा व्यवस्था बिघडू शकते, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक नियमांवलींमध्ये म्हटले आहे.

प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाची सुरूवात वंदे मातरमने होईल. त्यानंतर जन गण मन हे राष्ट्रगीत होईल आणि मगच प्रत्येक अधिकृत कार्यक्रमाला प्रत्यक्ष सुरूवात होईल. नव्या नियमावलीनुसार वंदे मातरमचे संपूर्ण सहा कडवे गाणे किंवा वाजवणे अनिवार्य आहे. त्यामध्ये १९३७ मध्ये काँग्रेसने वगळलेल्या चार कडव्यांचाही समावेश असेल. वंदे मातरम गीताच्या सहा कडव्यांचा अधिकृत कालावधी ३ मिनिटे १० सेकंदांचा आहे. हे नवे नियम राष्ट्रीय सन्मानाचा अनादर प्रतिबंधक अधिनियमातील तरतुदींनुसार लागू करण्यात आले आहेत. त्यात राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगानाचे अपमान अथवा अनादर केल्यास कमाल तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे.

कुठे, कुठे वंदे मातरम् अनिवार्य?

शाळा, सर्व सरकारी, इतर अधिकृत आयोजने, राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे आगमन किंवा प्रस्थान समारंभ, राष्ट्रपती जेव्हा टीव्ही किंवा आकाशवाणीवरून देशाला संबोधित करतील त्याच्याही सुरूवातीला आणि शेवटी वंदे मातरम् हे राष्ट्रगान वाजवणे किंवा गाणे अनिवार्य राहील.

नागरी सत्कार समारंभांमध्येही वंदे मातरम् गाणे किंवा वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरी सत्कार समारंभांमध्ये पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचाही समावेश करण्यात आला आहे. सर्व शाळांमध्ये दिवसाच्या सुरूवातीला वंदे मातरम् हे गीत सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

‘वंदे मातरम्’वरून कायम वाद

बंकीमचंद्र चटोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी वंदे मातरम् या गीताची रचना केली होती. हे गीत १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट आहे. मात्र हे गीत कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी हे गीत जोडले गेले.

१९३७ मध्ये काँग्रेसने वंदे मातरम या गीतातील सुरूवातीची केवळ दोन कडवी स्वीकारली होती. कारण त्यानंतरच्या कडव्यांमध्ये हिंदू देव-देवतांचा उल्लेख होता. वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ ही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. राष्ट्रगीताइतकाच राष्ट्रगानालाही सन्मान आणि शिष्टाचार प्रदान करणे हा या नव्या नियमावलीचा उद्देश आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!