पंकजा मुंडेंनी वैद्यनाथ साखर कारखान्यासह गोपीनाथ मुंडेंचे स्मारकही विकले?, शेतकरी नेत्याचा सनसनाटी दावा; कवडीमोल भावातील व्यवहारावरून वादंग


बीडः  बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील पांगरी येथे दिवगंत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची विक्री करण्यात आल्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासोबत या कारखाना परिसरात असलेल्या गोपीनाथ गडाची जागाही विकल्याचा सनसनाटी दावा क्रांतीकारी शेतकरी संघटनेने केला आहे. शेतकरी, सभासद, कामगार आणि शासनाचीही फसवणूक करण्यात आल्यामुळे हा फेरफार रद्द करण्याची मागणी कायदाविषयक सल्लागार परमेश्वर गीते यांनी केली आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना १३१ कोटी ९८ लाख रुपयांत ओंकार साखर कारखान्याला विकण्यात आला आहे. १४ ऑगस्ट २०२५ रोजी अंबाजोगाई येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात ही नोंदणी नोंदवण्यात आली आहे. कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वास न घेता कारखाना विक्रीचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी केला आहे.

परळी तालुक्यातील कारखान्याच्या विक्रीची रजिस्ट्री अंबाजोगाई येथे कशी होऊ शकते? वैद्यनाथ सारख कारखाना कौठळी तांडा येथील कुळाच्या जमिनीवर उभा आहे आणि अशा जमिनीच्या विक्रीला कायदेशीर मर्यादा आहेत. विक्री करारावर पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाच्या स्वाक्षऱ्या असल्या तरी त्यांची बहीण यशश्री मुंडे यांची या करारावर स्वाक्षरी नाही. त्यामुळे हा विक्री करार यशश्री मुंडे यांना मान्य केला नव्हता का?  असा सवाल कुलदीप करपे यांनी केला आहे. कवडीमोल दराने वैद्यनाथ कारखान्याची विक्री करून बँकांचे कर्ज बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करपे यांनी केली आहे.

गोपीनाथ गडाची जमीनही विकली?

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या मालकीची १०४ हेक्टर जमीन आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मारकासाठी कारखान्याकडून गट नंबर ९२ मधील ४० गुंठे जमीन ९९ वर्षांच्या लीजवर १० हजार रुपये भाडेकराराने घेण्यात आली होती आणि या ४० गुंठे जमिनीवर गोपनीथ मुंडेंचे स्मारक ‘गोपीनाथ गड’ उभारण्यात आले. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याची सामग्री १०४ हेक्टर जमिनीसह विक्री केली आहे. विक्री झालेल्या जमिनीत गोपीनाथ गड असलेल्या गट नंबर ९२ चाही समावेश आहे. कारखाना विक्रीच्या रजिस्ट्रीमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आल्यामुळे गोपीनाथ मुंडेंचे स्मारकही विकल्यात जमा आहे, असा दावा कुलदीप करपे यांनी केला आहे.

कोणाचीच ‘ना हरकत’ न घेताच विक्री

वैद्यनाथ कारखान्यावर काही काळ कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलेले परमेश्वर गिते यांनीही या विक्री व्यवहारावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. वैद्यनाथ कारखान्याचे बेकायदेशीर  ऑफलाईन खरेदीखत करून १३१ कोटी ९८ लाख रुपयांत हा कारखाना ओंकार साखर कारखान्यास विकण्यात आला. ही नोंदणी अंबाजोगाई येथील सहदुय्यम निबंधक यांनी नोंदवली. विशेष म्हणजे खरेदी खतामुळे झालेले फेरफार मंडळ अधिकाऱ्यांनी कोणतीही सुनावणी न घेताच मंजूर केले. त्यामुळे शेतकरी, सभासदांचा विश्वासघात झाल्याने हा फेरफार रद्द करण्यात यावा, अशी मागणी परमेश्वर गिते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कारखान्याच्या सातबारा उताऱ्यावर शासनाचे भागभांडवल ६६७ लाख रुपये, शासकीय कर्ज १०१३ लाख रुपये आणि बीडच्या राज्य कर आयुक्तांची देणी २७.६१ कोटी व ३८ कोटी ९१ लाख रुपये असा कोट्यवधी रुपयांचा बोजा आणि कर्ज असतानाही संबंधित बँक, राज्य सरकार आणि राज्य कर आयुक्तांची ना हरकत घेण्यात आली नाही. तरीही अंबाजोगाईच्या सहदुय्यम निबंधकांनी ऑफलाइन खरेदीखत नोंदवून फसवणूक केली. त्यामुळे बेकायदेशीर खरेदीखत दस्त आणि मंजूर झालेले सर्व फेरफार रद्द करावेत, असे गिते यांनी तक्रारीत म्हटले आहे.

स्पर्धात्मक नव्हे, संगनमताने विक्री व्यवहार

वैद्यनाथ कारखान्याचे संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी सभासद, हितचिंतक, शेतकरी व कामगारांना विश्वासात न घेता कारखाना कर्जबाजारी केला आणि बँकेमार्फत कवडीमोल भावाने विक्री केला. विक्रीसाठी काढलेल्या लिलावात कोणीही सहभागी झाले नाही. त्यामुळे कारखान्याच्या विक्रीत स्पर्धात्मक किंमत झाली नाही. केवळ ओंकार सारखर कारखाना प्रा. लि. यांनी युनियन बँक ऑफ इंडिया आणि वैद्यनाथ कारखान्याशी संगनमत करून स्पर्धात्मक लिलाव न करता कोट्यवधी रुपयांची कारखान्याची मालमत्ता कवडीमोल भावात ताब्यात घेतली, असा आरोपही गिते यांनी या तक्रारीत केला आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत, ७००० सभासद हवालदिल

वैद्यनाथ कारखान्याचे ७००० सभासद आहेत. या बेकायदेशीर विक्री व्यवहारामुळे कामगार, शेतकरी व ठेकेदारांची देणी, सभासदांचे शेअर्स, भागभांडवलाची रक्कम कोण देणार? या बाबत या विक्री करारनाम्यात कोणतीही स्पष्टता नाही. सभासदांचे भागभांडवल ओंकार कारखान्यात रुपांतरित होणार की नाही?  या प्रश्नही अनुत्तरीतच आहे. त्यामुळेच पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात झालेला हा व्यवहार वादग्रस्त ठरला असून या व्यवहारामुळे त्यांची राजकीय कारकीर्दच पणाला लागण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!