राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, माना टाकू लागलेल्या पिकांना मिळणार जीवदान; वाचा तुमच्या भागात कसे असेल पाऊसमान?


मुंबईः दक्षिण ओडिशावर चक्राकार स्थिती निर्माण होत असून कर्नाटक ते आंध्रप्रदेशदरम्यान एक ट्रफ रेषा हवामानाच्या एकूणच स्थितीवर परिणाम करत असल्यामुळे पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा इशारा दिला असून त्यामुळे पावसाअभावी माना टाकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे.

शनिवारपासूनच राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवस पावसाचा हा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. २४ जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र नव्याने तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या तीन-चार दिवसात कोकण, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या जोरदार सरी तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यातच आता हवामान खात्याने आणखी काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रावर पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण किनारपट्टी विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. तर काही भागांना तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

केंद्रीय हवामान विभागाने राज्याच्या अनेक भागात २१ ते २७ जुलै आणि २७ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. चालू आठवड्यातही राज्याच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. ओडिशात निर्माण होत असलेल्या चक्राकार स्थितीमुळे चालू आठवड्यात महाराष्ट्रातील पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अरबी समुद्रात पावसाला पोषक वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पुढील चार दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. मराठवाड्यात धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तुमच्या भागात कशी असेल स्थिती?

मंगळवार, २२ जुलैः पालघर, ठाणे, मुंबई, पुणे घाटमाथा, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बुधवार, २३ जुलैः पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक घाटमाथा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गुरूवार, २४ जुलैः चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, पुणे घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,ठाणे जिल्ह्यात अतिमुसळधार तर पालघर, मुंबई, नाशिक घाटमाथा क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

शुक्रवारी, २५ जुलै रोजी विदर्भाच्या बहुतांश भागात मुसळधार तर मराठवाड्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवसांसाठी काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!