
पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी करण्यात आलेल्या एका ताज्या सर्वेक्षणात बिहारमधील ७१.५५ टक्के दलितांना नवीन मतदार यादीत त्यांचे मत हिरावले जाण्याची भीती असल्याचा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथील २७.४२ टक्के दलित मतदारांनी निवडणूक आयोगावर विश्वास नसल्याचेही याच सर्वेक्षणात सांगितले आहे.
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघड वाजू लागले आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण (एसआयआर) सुरू केले आहे. बिहारमधील ऐनविधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडून उचललेल्या या पावलावर विरोधी पक्षाकडून टिकेची झोड उठवली जात आहे. बिहारच्या मतदार यादीतून भाजपला ४ ते ५ टक्के मतदार हद्दपार करायचे आहेत,असा आरोप राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला असतानाच या ताज्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष हाती आले आहेत.
नॅशनस कॉन्फडरेशन ऑफ दलित अँड आदिवासी ऑर्गनायझेशन आणि द कॉन्झर्व्हेटिव्ह मीडियाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहारमधील दलितांचे हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून बिहारमधील दलित मतदार नेमका काय विचार करतो, याचे चित्रच समोर आले आहे. बिहारमधील सर्वाधिक दलित मतदारांची पहिली पसंत काँग्रेस-राजदच्या नेतृत्वातील महागठबंधन आहे. ४६ टक्के दलित मतदरांनी महागठबंधन पसंती दिली आहे आणि ३२ टक्के दलित मतदारांनी एनडीएला पसंती दिली आहे तर २२ टक्के दलित मतदारांची पसंत अन्य राजकीय पक्ष आहेत.
या सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष म्हणजे बिहारमधील बहुतांश दलित मतदारांना नवीन मतदार यादीत त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला जाण्याची भीती आहे. नवीन मतदार यादीत तुमचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाईल, अशी भीती तुम्हाला वाटते का? असा प्रश्न या सर्वेक्षणात दलित मतदारांना विचारण्यात आला होता. त्यावर ७१.५५ टक्के दलित मतदारांनी ‘हो’ असे उत्तर दिले आहे तर ३२.७४ टक्के दलित मतदारांनी त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाण्याची भीती नसल्याचे सांगितले आहे. ५.०१ टक्के दलित मतदारांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
निवडणूक आयोगावर विश्वास आहे?: निवडणूक आयोगावर तुमचा विश्वास आहे का? असा प्रश्न या सर्वेक्षणात बिहारमधील दलित मतदारांना विचारण्यात आला होता. त्यावर ५१.२२ टक्के दलित मतदारांनी निवडणूक आयोगावर आपला विश्वास असल्याचे सांगितले आहे तर २७.४२ टक्के दलित मतदारांनी निवडणूक आयोगावर त्यांचा विश्वास नसल्याचे म्हटले आहे. २१.३६ टक्के लोकांनी या प्रश्नावर ‘माहीत नाही’ असे उत्तर दिले आहे.
तेजस्वी यादवांना सर्वाधिक पसंतीः तुमचा सर्वात आवडता नेता कोण? असा प्रश्न या सर्वेक्षणात दलित मतदारांना विचारण्यात आला होता. त्यावर २९ टक्के दलित मतदारांनी राजद नेते तेजस्वी यादव हे आपला सर्वात आवडता नेता असल्याचे म्हटले आहे. २३ टक्के दलित मतदारांनी नितीश कुमार यांना पसंती दिली आहे तर उर्वरित दलित मतदारांनी जीतनराम मांझी, प्रशांत किशोर यांच्यासारख्या नेत्यांना पसंती दिली आहे.
जातनिहाय जनगणनेचे श्रेय कोणाला?: बिहारमधील ४९ टक्के दलित मतदारांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारची कामगिरी खराब असल्याचे म्हटले आहे तर ४५ टक्के मतदारांनी नितीश कुमार सरकारची कामगिरी चांगली असल्याचे म्हटले आहे. ६ टक्के मतदारांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. जातनिहाय जनगणनेचे श्रेय कोणाला देता? या प्रश्नावर सर्वाधिक ३३.१५ टक्के दलित मतदारांनी जातनिहाय जनगणनेचे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना, ३०.८१ टक्के दलित मतदारांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना तर २७.२७ टक्के दलित मतदारांनी तेजस्वी यांना श्रेय दिले आहे. ८.४७ टक्के मतदारांनी याचे श्रेय अन्य नेत्यांना दिले आहे.
सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता?: तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा मोठा मुद्दा कोणता? असे बिहारमधील दलित मतदारांना विचारले असता सर्वाधिक दलित मतदारांनी बेरोजगारी हा सर्वात महत्वाचा आणि मोठा मुद्दा असल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार ५८.८५ टक्के दलित मतदारांनी बेरोजगारी, १४.६८ टक्के लोकांनी शिक्षण आणि आरोग्य, ११.२१ टक्के मतदारांनी भ्रष्टाचार, ९.४५ टक्के मतदारांनी कायदा व सुव्यस्ता आणि ५.८१ टक्के दलित मतदारांनी स्थलांतर हा सर्वात मोठा आणि महत्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले आहे.