सोशल मीडियावर २५ हजार फॉलोअर्स नसतील तर मिळणार नाही भाजपची उमेदवारी!


नाशिकः समाज माध्यमे म्हणजेच सोशल मीडिया हा जसा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य  भाग बनला आहे, तसाच तो राजकारणाचाही अविभाज्य भाग बनला आहे. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर तुमचे किती फॉलोअर्स आहेत, यावरून आता तुमचे समाज आणि राजकारणातील वजनही ठरू लागले आहे. भाजपने तर चक्क ज्याचे सोशल मीडियावर २५ हजार समर्थक नसतील, त्याला उमेदवारीही दिली जाणार नाही, अशी घोषणाच करून टाकली आहे.

भाजपच्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचा शनिवारी सायंकाळी समारोप झाला. नाशिकच्या सातपूर येथील हॉटेल डेमॉक्रसीमध्ये झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष आ. आशिष शेलार आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली मात्र मुख्य मुद्दा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीचाच राहिला. २०२४ च्या निवडणुकीत सोशल मीडिया अतिशय महत्वाचा ठरणार आहे. या निवडणुकीत सोशल मीडियाशी जोडल्या गेलेल्या १८ ते ३० वयोगटातील तरूण मतदारांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. विरोधकांना सोशल मीडियाचे महत्व कळायला लागले आहे. त्यांच्याकडून नकारात्मकता पसरवली जात आहे. त्यामुळे  भाजपची शक्ती दाखवून सोशल मीडिया व्यापून टाका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत केले.

प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सोशल मीडियावर २५ हजार समर्थक नसतील तर त्या व्यक्तीला भाजपची उमेदवारीही दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. विरोधक सोशल मीडियावर सक्रीय होऊ लागल्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज करा, असा संदेशही या बैठकीतून देण्यात आला.

एकनाथ शिंदे गटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हः या बैठकीत भाजपने महाविजय २०२४ संकल्पाची घोषणा केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने महाविजयाचा संकल्प जाहीर करताना लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधानसभेसाठी मिशन २०० जाहीर केले आणि स्वबळावर शत-प्रतिशत भाजपचा नाराही दिला. भाजपच्या या नाऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची वाटचाल आणि भवितव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!