गाईला मिठ्या मारून ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे फर्मान अखेर मागे!


नवी दिल्लीः  जगभरात प्रेमाचा उत्स म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी म्हणजेच १४ फेब्रुवारीला गाईला मिठ्या मारून काऊ हग डे साजरा करण्याचे फर्मान अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्रीय पशुकल्याण मंडळाच्या या निर्णयावर देशभरातून टिकेची झोड उठली होती.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी गाईला मिठ्या मारून काऊ हग डे साजरा करा, असे निर्देश केंद्रीय पशुकल्याण मंडळाने जारी केले होते. या निर्देशावरून वादंग उठले होते. हे प्रकरण चिघळत चालल्याचे पाहून केंद्र सरकारने यात हस्तक्षेप केला त्यानंतर केंद्रीय पशुकल्याण मंडळाने हे निर्देश मागे घेतले.

१४ फेब्रुवारी रोजी काऊ हग डे साजरा करण्याचे केलेले आवाहन पशुसंवर्धन खात्याने दिलेल्या आदेशानुसार आम्ही मागे घेत आहोत, केंद्रीय पशुकल्याण मंडळाचे सचिव एस.के. दत्ता यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मारकी गाय शिंगावर घेतल्याशिवाय… दरम्यान, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्रीय पशुकल्याण मंडळाच्या या निर्णयावर गावरान शैलीत टिकास्त्र सोडले. मी अनेक वर्षे शेती करत होतो. गाईला गोंजारले जाते, हे मला माहिती होते. पण गाईला मिठी मारणे हे मी पहिल्यांदाच एकतोय. गाय मारकी असली तर शिंगावर घेतल्याशिवाय गप्प बसायची नाही. दिल्लीत बसणारे अधिकारी काय लिहितात, त्यांचे त्यांनाच माहीत नाही. त्यांना म्हणावे ये एकदा गाईसमोर तुझा हग डे साजरा करा होतोय ते बघ. फ्लॅट संस्कृतीमध्ये वाढलेल्यांना गाव, गाय, रेडकू, म्हैस, वासरू याबद्दल काही माहिती आहे का?  अन् निघाले काऊ हग डे साजरा करायला. हे सर्व थोतांड आहे. ज्यांनी हा जीआर काढला त्या दिवट्यांचा शेणाशी, मातीशी, शेतीशी काही संबंध नाही. यांना मेंढरे म्हणजे काय? विचारले तर सांगता यायचे नाही, असे अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!