राज्यपाल कोश्यारींकडून शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख, व्हीडीओ शेअर करत मिटकरींचा शिंदे-फडणवीसांना खोचक सवाल


मुंबईः  महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले- सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले अवमानकारक वक्तव्य यामुळे राज्यपालपदावरून त्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी झालेली आंदोलने ताजी असतानाच आता पुन्हा त्याच राज्यपाल कोश्यारींनी राजभवनातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या भाषणाचा व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरूषांबद्दल करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यांवरून महाराष्ट्राचे राजकारण आधीच तापलेले आहे. महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्ये करण्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा बराच वरचा क्रमांक लागतो. महापुरूषांबद्दलच्या त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून त्यांच्यावर प्रत्येकवेळी जोरदार टीकाही झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून उठलेला वाद शांत नाही तोच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत ‘शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श थे…’ असे अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यावरून राज्यभर निषेध आंदोलनेही झाली आहेत. या घटना ताज्या असतानाच राज्यपाल कोश्यारी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील राजभवनात आयोजित एका कार्यक्रमातील भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर काही महापुरूषांचा एकेरी उल्लेख केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘राज्यपालांच्या मनात नेमके काय चाललेय? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का?’  असा खोचक सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.

 राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांचा एकेरी उल्लेख! नेमके राज्यपालांच्या मनात चाललंय तरी काय? आता तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत खुलासा करतील का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी या  ट्विटमध्ये विचारला आहे.

नेमके काय म्हणाले राज्यपाल?:  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हिंदीतून भाषण केले. या भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ‘आज सब कहते है, शिवाजी होने चाहिए, चंद्रशेखर होने चाहिए, भगतसिंह होने चाहिए, नेताजी होने चाहिए… लेकीन मेरे घर में नही…दुसरों के घर में होने चाहिए…’ असे म्हणत सर्वच महापुरूषांचा एकेरी उल्लेख करत आहेत. त्याचवरून अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक सवाल केला आहे.

राज्यपाल हटावच्या मागणीसाठी आंदोलनः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर उमटले. छत्रपतींच्या घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्यासह महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून हटवण्याची मागणी केली. त्यासाठी राज्यभर आंदोलनही केले होते.

 मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने मोठा मोर्चाही काढण्यात आला होता. या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपतींचा एकेरी उल्लेख केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!