तेव्हा गोपीनाथ मुंडेंना नितीन गडकरी ट्रॅपमध्ये अडकवायचे, आता फडणवीस पंकजा मुंडेंना… सुषमा अंधारे यांचा आरोप


भंडाराः ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक हैराण, परेशान करायचे. आता दुसऱ्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या महाप्रबोधन सभा घेत आहेत. त्यांच्या जाहीर सभांना मोठी गर्दीही होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी दिवंगत भाजप नेत गोपीनाथ मुंडे आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत भाष्य करताना हे वक्तव्य केले आहे.

 एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. इकडे नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी हे बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडेंना जाणीवपूर्वक हैराण, परेशान करायचे. त्यानंतर दुसऱ्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस हे लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

मी बीडमधील आहे. तर त्यांना वाटते ते मला हैराण करू शकतील. मात्र ते सध्या भ्रमात आहेत. तुम्ही माझ्या मागे ईडी लावू शकत नाही. उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावार कुठेही एक एकर जमीन नाही. माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन असेल तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझ्या कुटुंबियांना राजकारणाबाबत काहीही माहिती नाही, असेही अंधारे म्हणाल्या.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *