नवी दिल्लीः एनडीटीव्हीचे संस्थापक डॉ. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी राजीनामा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजे आज बुधवारी एनटीडीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रविश कुमार यांनीही एनडीटीव्हीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे देशातील दर्शकांना एनडीटीव्ही इंडियावरील रात्री ९ वाजताचा त्यांचा प्राईम टाईम दिसणार नाही. हम लोग, रविश की रिपोर्ट, देश की बात असे गाजलेले शोही त्यांनी एनडीटीव्ही इंडियावर केले आहेत. कंपनीने त्यांचा राजीनामा तत्काळ मंजूर केला आहे.
रविश कुमार यांच्या इतका काही पत्रकारांनीच लोकांवर प्रभाव पाडला आहे. हे त्यांच्याबाबतच्या अफाट प्रतिक्रियांमधून प्रतिबिंबित होते. गर्दीतही ते सर्वत्र उठून दिसतात. भारत आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर त्यांना मिळालेले प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि ओळख हे त्यातून स्पष्ट होते. रविश कुमार हे अनेक दशकांपासून एनडीटीव्हीचा अविभाज्य भाग राहिले आहेत. त्यांचे योगदान मोठे आहे. ते एक नवीन सुरूवात करतील आणि त्यात प्रचंड यशस्वी होतील, हे आम्हाला माहीत आहे, असे एनडीटीव्ही समूहाच्या अध्यक्षा सुपर्णा सिंग यांनी म्हटले आहे.
समाजाला भेडसावणाऱ्या समस्या, देशातील विद्यमान परिस्थिती यांची अचूक नस पकडून सामान्य माणसांशी थेट संवाद साधण्याची त्यांची लक्षणीय हातोटी आहे. रविश की रिपोर्ट आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांमधून त्यांनी जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न निर्भिडपणे सातत्याने मांडले आहेत. रविशकुमार हे १९९६ पासून एनडीटीव्हीशी जोडले गेले होते.
पत्रकारितेतील अतुलनीय योगदानाबद्दल रविश कुमार यांना रोमन मॅगेसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी दिल्या जाणाऱ्या रामनाथ गोयंका पुरस्काराने दोनवेळा सन्मानित करण्यात आले आहे. रविश कुमार हे देशातील लोकांवर व्यापक प्रभाव टाकणाऱ्या दुर्लक्षित मुद्यांच्या ग्राऊंड ब्रेकिंग कव्हरेजसाठी ओळखले जातात. विशेष म्हणजे भारतीय टीव्ही पत्रकारितेवर त्यांनी आपल्या प्राईम टाईम शोमधून कठोर शब्दांत आसूडही ओढले आहेत. ‘ए अंधेरा ही आज के टीव्ही की तसबीर है…’ हा त्यांचा शो विशेष गाजला होता.
प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळावरील संचालकपदाचा मंगळवारीच राजीनामा दिला. आरआरपीआर होल्डिंगचे संचालकपदी लगेचच सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि एस.एस. चेंगलवरायन यांची नियुक्ती केली आहे. आरआरपीआर होल्डिंगचे शेअर्स अदानी समूहाकडे गेल्यामुळे प्रणव आणि राधिका यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या दुसऱ्याच दिवशी रविश कुमार यांनाही एनडीटीव्ही इंडियाचा राजीनामा दिला आहे.