मुंबईः राज्यपाल हे एक संस्थात्मक पद असले तरी विद्यमान राज्यपालांनी सर्व मर्यांदाचे उल्लंघन केले आहे, अशा कठोर शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिकास्त्र सोडले. या संदर्भात आता राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनीच काय तो निर्णय घ्यावा, असेही पवार म्हणाले.
राज्यपाल ही एक संस्था आहे. त्याच्या काही मर्यादा आणि बंधने असतात. मात्र छत्रपतींचा उल्लेख करताना त्यांनी सगळ्या मर्यादा सोडल्या आहेत. त्या प्रकरणानंतर त्यांचे छत्रपतींबद्दल (चांगलं) बोलल्याचे स्टेटमेंट आले. मात्र सगळ्या प्रतिक्रियानंतर केलेले हे विधान म्हणजे उशीरा सूचलेले शहाणपण आहे, असे पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यपालांचा विषय आता राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनीच बघावा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. याचा निर्णय राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी घ्यावा. अशा व्यक्तीला अशा (राज्यपालपदासारख्या) जबाबदाऱ्या देऊ नयेत, असेही पवार म्हणाले.
बेळगाव, निपाणी, कारवार देणार असाल तर…: सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये समाविष्ट करून घेण्याचा कर्नाटक सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे वक्तव्य त्या राज्याचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी केले होते. त्यांनाही शरद पवार यांनी रोखठोक उत्तर दिले. बेळगाव, कारवार, निपाणी आम्हाला देणार असाल तर जतच्या गावांची चर्चा करू, असे पवार म्हणाले. सीमावादावर भाजपला भूमिका टाळता येणार नाही. भाजपने यावर तत्काळ भूमिका जाहीर करावी, असेही पवार म्हणाले. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरचा महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. या लढ्यात महाराष्ट्राचे सातत्य राहिले आहे. मी काल बोम्मईंचे जतबाबतचे विधान ऐकले. जर तिकडचे सरकार बेळगाव, कारवार, निपाणी हा सगळा परिसर आपल्याला सोडायला तयार असेल तर त्यांना काय काय देता येईल, यावर चर्चा करणे शक्य होईल, असे पवार म्हणाले.