मुंबईः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकरांना माफीवीर संबोधल्यामुळे उठलेले राजकीय वादळ शांत होत नाही तोच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज सावरकरांवर खळबळजनक आरोप केला आहे. महात्मा गांधींच्या हत्येसाठी सावरकरांनी नथुराम गोडसेला बंदूक पुरवली होती, असा आरोप करून तुषार गांधी यांनी खळबळ उडवून दिली आहे. हा आरोप नसून इतिहासात जे नोंदले गेले, तेच आपण सांगत असल्याचे तुषार गांधी म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकरांना माफीवीर संबोधत सावरकरांनी इंग्रजांना लिहून दिलेला माफीनामाच सादर केला होता. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही राहुल गांधी यांनी दाखवून दिले होते. त्यावरून भाजपने त्यांना लक्ष्यही केले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जात असतानाच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांवर गंभीर आरोप केला आहे.
सावरकरांनी फक्त ब्रिटिशांना मदतच केली नाही तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस गोडसेकडे महात्मा गांधींची हत्या करण्यासाठी कोणतेही विश्वासार्ह शस्त्र नव्हते, असे ट्विट तुषार गांधी यांनी केले आहे. तुषार गांधी यांच्या या विधानावरून देशाचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रबोधनकार ठाकरेंनी वाचवले होते प्राणः १९३० मध्ये बापूंवर प्राणघातक हल्ल्याचे अनेक प्रयत्न केले गेले. प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या सहकाऱ्यांना अकोला, विदर्भात बापूंचा खूनाच्या कटाबाबत सावध केले आणि बापूंचे प्राण वाचवले होते. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटना आणि त्यांच्या नेत्यांना बापूंवर प्राणघातक हल्ल्यापासून रोखण्यासाठी एक सार्वजनिक इशारा जारी केला होता. सावरकर आणि हेडगेवार सनातनी हिंदूंचे नेते होते. त्यामुळे प्रबोधनकारांचा इशारा त्यांना उद्देशून होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना या इतिहासाची आठवण करून दिली पाहिजे, असे तुषार गांधी यांनी दोन स्वतंत्र ट्विट करून म्हटले आहे.
दरम्यान, याबाबत एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना तुषार गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण कोणताही आरोप करत नाही. ज्याची इतिहासात नोंद आहे, तेच सांगत आहे. पोलिसांच्या एफआयआरमध्ये नोंद आहे त्यानुसार २६-२७ जानेवारी १९४८ च्या सुमारास नथुराम गोडसे आणि विनायक आपटे सावरकरांना भेटले होते. त्या दिवसापर्यंत नथुराम गोडसेकडे बंदूक नव्हती. बंदुकीच्या शोधात तो संपूर्ण मुंबई फिरत होता. मात्र या भेटीनंतर ते थेट दिल्लीला गेले आणि तेथून ग्वाल्हेरला गेले, असे तुषार गांधी म्हणाले.
एकंदर घटनाक्रम सांगताना तुषार गांधी म्हणाले की, ग्वाल्हेरला गेल्यानंतर तेथे त्यांनी सावरकरवादी परचुरेंची भेट घेतली. यानंतर त्यांना त्यांना सर्वात चांगली पिस्तूल मिळवून दिली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवसआधी हे सर्व घडले. हेच मी सांगितले असून नवीन काही आरोप केलेला नाही, असेही तुषार गांधी म्हणाले.