
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून निवृत्त झालेल्या महिला सफाई कामगाराची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच स्वीकरताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज रंगेहाथ पकडले. एसीबीच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सफाई कामगारपदावरून निवृत्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याची सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची ३ लाख ६३ हजार ६१९ रुपये रक्कम येणे बाकी आहे. विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयातून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची ही रक्कम मिळवून देतो असे सांगून रुपचंद बाबुलाल मुंगसे (वय ५४ वर्षे) आणि दीपक नंदकिशोर रॉय (वय ५९ वर्षे) या दोघांनी या निवृत्त महिलेच्या मुलाकडे १८ हजार रुपये लाचेची मागणी केली. मुंगसे आणि रॉय हे दोघही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातच शिपाई आहेत.
मुंगसे आणि रॉय या दोघांनी तक्रारदाराकडून त्याच्या सेवानिवृत्त आईच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विभागीगय सहसंचालक कार्यालयातून मिळवून देण्यासाठी आजच लाचेची मागणी केली आणि लाचेची रक्कम तत्काळ स्वीकारण्याचे मान्यही केले.
तक्रारदाराने संपर्क साधताच छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल धस यांनी आज दुपारी विद्यापीठात सापळा रचला. या सापळा कारवाईत दीपक रॉय याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष १८ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याला लाचेच्या रकमेसह एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसीबीचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव आणि पोलिस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल धस यांनी ही कारवाई केली. त्यांना पोलिस अंमलदार हिवाळे यांनी मदत केली. लाचलुचपत विभागाच्या या कारवाईमुळे विद्यापीठ वर्तुळ आणि उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून या गुन्ह्याच्या तपासाचे धागेदोरे कुठवर पोहोचतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
