
मुंबईः विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उद्या सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने जाहीर केलेल्या तीन उमेदवारांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) संजय केणेकर यांचाही समावेश असून संदीप जोशी आणि दादाराव केचे हे अन्य दोन उमेदवार आहेत.
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होत आहे. विधान परिषदेवरील पाच आमदार विधान सभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या ५ जागांसाठी विधान परिषदेची ही पोटनिवडणूक होत आहे. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होणार असल्यामुळे या पाचही जागा महायुतीलाच मिळण्याची शक्यता आहे. एकापेक्षा अधिक जागांसाठी पोटनिवडणूक होत असल्यास नियमानुसार प्रत्येक जागा स्वतंत्र मानली जाते.
या पाच जागांपैकी भाजपला तीन तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (१७ मार्च) शेवटचा दिवस असून या निवडणुकीसाठी भाजपने संजय केणेकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे असे तीन उमेदवार जाहीर केले आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी कोणकोणत्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे तर्क लावले जात होते. विधानसभेवर जाण्याची संधी न मिळालेले भाजपचे नेते व प्रवक्ते विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छूक होते. पंरतु त्यांचा भाजपकडून हिरमोड झाला आहे. भाजपने विधान परिषदेसाठी जाहीर केलेले तीनही उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.
केणेकरांना विश्वासाचे फळ
भाजपने जाहीर केलेल्या तीन उमेदवारांमध्ये छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील संजय केणेकर यांचाही समावेश आहे. केणेकर हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. केणेकर हे १९९८ पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. अभाविपच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरूवात केली. त्यानंतर भाजयुमोचे वार्ड अध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्ष बनले.
संजय केणेकर यांनी तब्बल १५ वर्षे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले. त्यांनी उपमहापौर आणि गटनेता म्हणूनही काम केले आहे. २०१९ मध्ये त्यांची म्हाडाच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती.