कोहिनूर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ‘चारसौ बीसी’: मुक्त विद्यापीठाने नेमली प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समिती, उद्यापासून झाडाझडती!


नाशिकः छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून स्वतःचे एम.ए. (हिंदी) प्रथम सत्राच्या परीक्षेचे सर्व पेपर त्यांच्याच हस्ताक्षरात सोडवून घेतल्याच्या प्रकरणाची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून संस्थाचालकांच्या या ‘चारसौ बीसी’च्या चौकशीसाठी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती सोमवारपासून चौकशीला सुरूवात करणार आहे.

कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी स्वतःच्याच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर दिवसाढवळ्या केलेल्या या ‘चारसौ बीसी’चा न्यूजटाऊनने पर्दाफाश केला होता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी या या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती सोमवारपासून चौकशीला प्रारंभ करणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड यांनी न्यूजटाऊनशी बोलताना दिली.

हेही वाचाः कोहिनूरच्या अध्यक्षांची ‘चारसौ बीसी’: मुक्त विद्यापीठाच्या स्वतःच्याच परीक्षा केंद्रावर प्राध्यापकांवर दबाव टाकून सोडवून घेतले स्वतःचे एमए हिंदीचे पेपर!

ही चौकशी समिती डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांचे प्रत्यक्ष हस्ताक्षर आणि उत्तरपत्रिकांमधील हस्ताक्षराची तपासणी करणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजचीही झाडाझडती घेणार आहे. ज्या प्राध्यापकांवर येथील अभ्यास केंद्र आणि परीक्षा केंद्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांचीही ही समिती चौकशी करणार आहे. डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांच्या दबावाला बळी पडून ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या दोघांचे एम.ए. हिंदी प्रथम सत्राचे सर्व पेपर सोडवून दिले, तेही चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या अध्यक्षांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ८९ लाख रुपये वेतन केले परत, सहसंचालक महाविद्यालयात धडकताच झाला ‘सिंघम’स्टाइल राडा!

खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र आहे. या अभ्यास केंद्रावर हे महाविद्यालय चालवणाऱ्या कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी एम.ए. (हिंदी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या अभ्यास केंद्राला डिसेंबर २०२४ च्या सत्र परीक्षेचे परीक्षा केंद्रही देण्यात आले होते.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले १ कोटी २५ लाख १८ हजार ८७८ रुपयांचे वेतन अनुदान, ‘काल्पनिक’ कार्यभार दाखवून केली मनमानी प्राध्यापक भरती?

हेही वाचाः शासनाकडून पदवी अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी एकाच तुकडीला मंजुरी असतानाही चार-चार तुकड्या दाखवून कोहिनूर महाविद्यालयाची खुलेआम दुकानदारी!

डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२५ या काळात झालेल्या एम. ए. हिंदी प्रथम सत्राच्या परीक्षेत स्वतः पेपर न सोडवता कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक फेरोज व कार्यालयीन कर्मचारी बाळू भोपळे यांच्यासह अन्य शिक्षक व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याच हस्ताक्षरात एम.ए. हिंदी प्रथम सत्राचे सर्व लेखी पेपर सोडवून घेतले होते.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने ढापले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचेही पैसे, कोट्यवधींच्या अनामत रकमेवरही डल्ला!

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाने हडपले चार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस, जीपीएफचेही लक्षावधी रुपये; आता तरी कारवाई होणार का?

एखाद्या परीक्षार्थ्याला कोणत्याही परीक्षेत काही अपरिहार्य वैद्यकीय कारणांमुळे स्वतःच्या हस्ताक्षरात परीक्षेचे पेपर सोडवणे शक्य नसेल तर त्या परीक्षार्थ्याला विद्यापीठाकडे रितसर अर्ज करून परीक्षेपूर्वीच लेखनिकाची मागणी करून परवानगी घ्यावी लागते. परंतु या दोघांनीही तशी कोणतीच पूर्वपरवानगी न घेताच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांच्याकडून त्यांच्याच हस्ताक्षरात सर्व पेपर सोडवून घेऊन फसवणूक केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करावा आणि या महाविद्यालयातील अभ्यास केंद्र रद्द करावे, अशी तक्रार रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी केली होती. या तक्रारीनंतर मुक्त विद्यापीठाने तातडीने चौकशीचे आदेश जारी केले असून स्वतःच्याच महाविद्यालयात बेबंदशाही करणारे डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान आता चांगलेच अडकण्याची शक्यता आहे.

तत्काळ कायदेशीर कारवाई कराः आ. बंब

दरम्यान, गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनीही कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान  आणि सचिव डॉ. आस्मा खान यांनी मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत केलेल्या फसवेगिरीची महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल तसेच मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे तक्रार केली आहे.

हेही वाचाः कोहिनूर महाविद्यालयाचे व्यवस्थापन हस्तांतरित होणार अन्य व्यवस्थापनाकडे?, विभागीय सहसंचालकांच्या पत्रानंतर विद्यापीठाच्या कारवाईकडे लक्ष!

कोहिनूर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र व परीक्षा केंद्र तत्काळ बंद करण्यात यावे आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी  संस्था अध्यक्ष व सचिवांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाईची आवश्यकताही आ. बंब यांनी अधोरेखित केली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!