मंत्री धनंजय मुंडेंना दणकाः पत्नी करूणा मुंडेंना द्यावी लागणार दरमहा दोन लाख रुपये पोटगी, पहिल्या पत्नीचा दर्जाही कौटुंबिक न्यायालयाकडून मान्य!


मुंबईः बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या व्यावसायिक संबंधांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवले आहे. करूणा शर्मा-मुंडे यांनी केलेले आरोप आणि धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आपणच असल्याचा दावाही कौटुंबिक न्यायालयाने मान्य केला असून करूणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

करूणा शर्मा यांनी आपणच मंत्री धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी असल्याचा दावा करत वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दावा दाखल केला होता. मला आणि माझ्या दोन मुलांना प्रत्येकी ५ लाख रुपयांप्रमाणे दरमहा १५ लाख रुपयांची पोटगी देण्यात यावी, अशी मागणीही करूणा मुंडे यांनी केली होती. परंतु वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने दरमहा २ लाख रुपये पोटगी मंजूर केली आहे.

करूणा मुंडे यांना दरमहा १ लाख २५ हजार रुपये आणि त्यांची मुलगी शिवानी मुंडे हिला तिच्या लग्नापर्यंत दरमहा ७५ हजार रुपये देण्यात यावेत, असा आदेश वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाने दिल्याचे करूणा मुंडे यांचे वकील गणेश कोल्हे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.

मी १९९६ पासून माझ्या नवऱ्यासोबत होते. तेव्हापासूनची जी आमची जगण्याची पद्धत आहे, त्यासाठी आम्हाला १५ लाख रुपये पोटगी मिळायला हवी होती. दोन लाखात काहीही होत नाही. ही लढाई सुरूच राहणार आहे. पोटगी वाढवून मिळावी, यासाठी आपण उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे करूणा मुंडे म्हणाल्या.

मी धनंजय मुंडे यांची पत्नी आहे की नाही? हे आम्हाला न्यायालयात सिद्ध करावे लागले. न्यायालयाने मला धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नीचा दर्जा दिला आहे. मी मुंडे नावासाठी जी लढाई लढत होते, ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे यापुढे माझा उल्लेख करूणा शर्मा नव्हे तर करूणा धनंजय मुंडे असाच करावा, असेही करूणा मुंडे म्हणाल्या.

मागच्या तीन वर्षांपासून मी खूप त्रास भोगला आहे. फक्त पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पतीशिवाय एका महिलेने जीवन जगणे खूप अवघड असते. आपला पती जेव्हा उच्च पदावर असतो, तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्या बाजूने काम करत असते. त्यांच्याकडे मोठमोठे वकील होते. तरीही मी लढाई लढली. माझ्या वकिलांनी मला प्रामाणिकपणे न्याय मिळवून दिला, असे करूणा मुंडे म्हणाल्या.

माझ्या आईने आत्महत्या केली होती. जसा आता माझा छळ सुरू आहे, तसा त्यांनाही त्रास दिला होता. मला दोन वेळेस तुरुंगात ठेवले होते. येरवडा तुरूंगात ४५ दिवस आणि बीडच्या तुरुंगात १६ दिवस ठेवले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मला वाल्मिक कराडच्या गुंडांनी मारहाण केली. माझी गाडी फोडली. माझ्या बहिणीचेही शारीरिक शोषण केले, असा आरोपही करूणा मुंडे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!