छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात अजिबात ढवळाढवळ करू नका, अशी तंबी राज्यपाल तथा कुलपतींनी देऊनही विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी अरेरावी करत अर्वाच्च भाषेत त्यांना अपमानित केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्याविरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद आणि अधिसभा सदस्यांच्याच एका गटाने आता कुलपतींकडे धाव घेतली आहे. डॉ. सानप यांचा उच्च शिक्षणाशी तिळमात्र संबंध नाही, व्यवस्थापन परिषदेवरील त्यांचे नामांकन विद्यापीठ कायद्यातील निकषांना अनुसरून नाही. त्यामुळे त्यांच्या नामांकनाचा पुनर्विचार करा, अशी मागणी त्यांनी कुलपती तथा राज्यपालांकडे केली आहे. या गटाने डॉ. सानप यांच्यावर काही गंभीर आरोपही केले आहेत.
डॉ. गजानन सानप यांनी २३ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या दालनातच अरेरावी करत त्यांना अर्वाच्च भाषेत बोलून अपमानित केले. त्यामुळे संतप्त झालेल्या परीक्षा विभागातील कर्मचारी आणि विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी सेवक संघाने कुलपतींना निवेदन देऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली. आता व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेच्या १७ सदस्यांच्या गटाने त्यांच्याविरुद्ध थेट कुलपतींकडे लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीत कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या नेतृत्वाचे तोंडभर कौतुक करत डॉ. सानप यांच्या गैरवर्तनाचा पाढाचा वाचण्यात आला आहे. डॉ. फुलारी यांनी कुलगुरूपदांची सूत्रे हाती घेतल्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ घोडदौड करत आहे. परंतु विद्यापीठाला अजूनही आर्थिक चणचण, मनुष्यबळाची कमतरता, विद्यार्थी संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या अनावश्यक हस्तक्षेप अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
डॉ. गजानन सानप यांचे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून करण्यात आलेले नामांकन विद्यापीठ कायद्याने निश्चित केलेल्या निकषांशी जुळत नाही. डॉ. सानप हे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आहेत. ते उच्च माध्यमिक शिक्षणाशी संबंधित आहेत. उच्च शिक्षणाशी त्यांचा अजिबात संबंध नाही. उच्च शिक्षणात शिक्षणतज्ज्ञ/उद्योजक म्हणून किंवा विद्यापीठ कायद्यात नमूद मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक किंवा इतर संरेखित क्षेत्रात त्यांचे कोणतेही महत्वपूर्ण योगदान नाही. त्यामुळे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांच्या नामांकनाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे.
उच्च शिक्षणाशी त्यांचे काही एक देणे घेणे नसतानाही त्यांचे व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून केलेले नामांकन राजकीय हेतूने करण्यात आलेले दिसते. त्यामुळे विद्यापीठ कायद्याने स्थापित केलेल्या निकषांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी या प्रकरणाची समीक्षा करण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो, असे या तक्रारीत म्हटले आहे.
कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंच्या दालनात राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्याकडून वारंवार होत असलेल्या अव्यावसायिक आणि अनुचित वर्तनाच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक बैठकांमध्ये डॉ. सानप यांचे वर्तन हे अत्यंत विघटनकारी, अपमानजनक आणि विद्यापीठाच्या कामकाजाच्या वातावरणासाठी हानिकारक राहिलेले आहे. डॉ. सानप यांच्या वर्तनामुळे अनेक प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे, असे नमूद करत २३ जानेवारी रोजी कुलगुरूंच्या दालनात प्र-कुलगुरू आणि कुलसचिवांच्या समक्ष डॉ. सानप यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाची घटना कथन करण्यात आली आहे. डॉ. सानप हे कुलगुरूंच्या दालनात डॉ. भारती गवळी यांच्यावर मोठ्या आवाजात खेकसले आणि त्यांना धमकी दिली. त्यांच्या या वर्तनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे या गटाने केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचाः AI University: देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ महाराष्ट्रात, समिती गठीत करण्याचे आदेश
‘तो’ माझा माणूस…
डॉ. एस.बी. चव्हाण हा माझा माणूस आहे आणि माझ्या वतीने परीक्षेशी संबंधित काम करण्यासाठी त्यांची बदली मुद्दाम परीक्षा विभागात करण्यात आली आहे, असे डॉ. सानप हे उघडपणे सांगत असल्याचे कुलगुरूंच्या दालनातील सीसीटीव्ही कॅमेरात रेकॉर्ड झालेले आहे. विद्यापीठाच्या दैनंदिन कामकाजात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सानप यांच्याकडून वारंवार होत असलेला अशा पद्धतीचा हस्तक्षेप खपवून घेतला जाऊ नये, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
सानप यांच्या गैरवर्तनाचे ‘कर्तृत्व’ असे
डॉ. सानप यांनी केवळ भारती गवळी यांच्याशीच नव्हे तर विद्यापीठातील अनेक संवैधानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशीही गैरवर्तन केले आहे. त्यातील काही ठळक घटना या तक्रारीत नमूद करण्यात आल्या आहेत. त्या अशाः
- कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अगदी सुरूवातीच्या काळात डॉ. सानप हे कुलगुरूंच्या पोलिस अंगरक्षकावर अपमानास्पदरित्या खेकसले. त्यामुळे अनुचित परिस्थिती निर्माण झाली.
- माजी व्यवस्थापन परिषद सदस्य शितोळे यांचे नाव असलेले नामफलक/ उद्घाटन फलक काढून टाकल्यामुळे डॉ. सानप यांनी कार्यकारी अभियंता रवींद्र काळे धमकी देणारी विधाने केली.
- हेही वाचाः ‘कोहिनूर’च्या अध्यक्षांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे ८९ लाख रुपये वेतन केले परत, सहसंचालक महाविद्यालयात धडकताच झाला ‘सिंघम’स्टाइल राडा!
- डॉ. सानप यांनी भरबैठकीत वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेच्या अधिष्ठाता व विभागप्रमुख प्रा. डॉ. वीणा हुंबे यांच्याशी अत्यंत अपमानास्पद भाषा वापरली आणि त्यांच्याशी असांसदीय शब्द वापरले. त्यामुळे बैठकीतच त्यांना रडू कोसळले.
- डॉ. सानप यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर यांच्यावर मोठ्या आवाजात खेकसत गैरवर्तन केले. त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांनाही अश्रू अनावर झाले.
सातत्याने असभ्य आणि आक्षेपार्ह वर्तन
या घटनांशिवाय डॉ. सानप यांचे बैठकांमधील वर्तन हे सातत्याने असभ्य आणि आक्षेपार्हच राहिले आहे. त्यामुळे विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दूषित आणि अस्वस्थ करणारे वातावरण निर्माण झाले आहे. डॉ. सानप हे आठ समित्यांचे सदस्य असूनही त्यांचे वर्तन अशा पदावर कार्यरत कोणत्याही व्यक्तीकडून अपेक्षित व्यावसायिक आचरणाच्या कोसो दूर आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
कुलपतींचा सल्लाही ‘बेदखल’
डॉ. आनंद वाघ यांच्याशी डॉ. सानप यांनी केलेल्या गैरवर्तनाच्या प्रकरणात आपल्या कार्यालयाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी डॉ. सानप संज्ञानपत्र लिहून विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. या संज्ञानपत्रानंतर डॉ. सानप यांच्या वर्तन-व्यवहारात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु तुमच्या संज्ञानपत्राची डॉ. सानप यांनी अजिबात दखल घेतली नाही. त्यांच्या अस्वीकारार्ह वर्तनामुळे विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर मानसिक आघात होत आहेत. सातत्याची टगेगिरी आणि धमक्यामुळे विद्यापीठात दडपशाहीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अधिकारी हतोत्साहित आणि प्रचंड अस्वस्थ झाले आहेत, असेही या तक्रारीत म्हटले आहे.
सानपविरोधी गटात कोण कोण?
या निवेदनावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. अंकुश कदम, प्राचार्य डॉ. भारत खंदारे, प्रा. रविकिरण सावंत, नितीन जाधव, गौतम पाटील, दत्ता भांगे, अधिसभा सदस्य हरिदास सोमवंशी, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. भास्कर साठे, डॉ. व्ही.सी. खिलारे, डॉ. चंद्रकांत कोकाटे, डॉ. उमाकांत राठोड, शेख झहूर खालीद, सुनिल निकम, प्रा. सुनिल मगरे, मुंजाभाऊ धोंगडे, विद्या परिषद सदस्य डॉ. प्रसाद मदान, डॉ. राजेश करपे, डॉ. आर.बी. लहाने आणि डॉ. गणेश मोहिते, डॉ. भारत खैरनार इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.