सोलापूरः वाळूच्या गाड्या आपल्याच लोकांच्या आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते, अशी कबुली राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापुरातील एका कार्यक्रमात दिली. विखे हे आधीच्या सरकारमध्ये महसूलमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशाची त्यांनी या कार्यक्रमात कबुली दिली. पण वाद निर्माण होण्याची शक्यता दिसताच नंतर मात्र त्यांनी सारवासारव केली.
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तोंडून ही ‘मन की बात’ बाहेर आली. यावेळी माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, माजी आमदार बबनराव शिंदे, राम सातपुते आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना विखे पाटील म्हणाले की, येथे स्टेजवर कुमार आशीर्वाद असले तरी शेवटी त्यांना मागे मी म्हटलं होते की वाळूच्या गाड्यांकडे दुर्लक्ष करा. गाड्या लाचू राहू द्या. काही फरक पडत नाही. आपलेच लोक आहेत सगळे…’ विखे पाटलंनी दिलेल्या या कबुलीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फक्त स्मितहास्य केले.
‘क्रशरच्याही गाड्या आहेत…’असे विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे बघून पुढे बोलू लागले. तेव्हा जयकुमार गोरे यांनी त्यांना सावध केले आणि विखेंनी वाळूबद्दल बोलणे आवरते घेतले.
हा कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांनी विखे पाटील यांना गाठले आणि वाळूच्या विधानाबद्दल त्यांच्याकडे पुन्हा विचारणा केली असता विखे पाटलांनी सारवासारव केली. सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेऊ नका. सगळ्या गोष्टी गंमतीने बोलतो माणूस. वाळू धोरणाच्या बाबतीत आम्ही अतिशय कडक आहोत. अधिकाऱ्यांवर देखील आम्ही कारवाई केली आहे. माझा नेहमीच वाळू काढण्याला विरोध राहिला आहे, अशी सारवासारव विखे पाटील यांनी केली.