कोहिनूर महाविद्यालयाच्या संस्थाचालकाने सर्व कर्मचाऱ्यांचे डिसेंबरचे वेतन ‘अचानक’ केले परत, सहसंचालक धडकताच झाला ‘सिंघम’ स्टाइल राडा!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे डिसेंबर-२०२४ महिन्याचे  शासनाकडून प्राप्त झालेले वेतन कोहिनूर शिक्षण संस्थेचे ध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालकांना परत करून टाकले. संस्थेने ‘अचानक’ घेतलेल्या या भूमिकेमुळे स्थळ पहाणी करून वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर मंगळवारी महाविद्यालयात धडकले. त्यानंतर महाविद्यालयात आधी शाब्दिक बाचाबाची आणि नंतर ‘सिंघम’स्टाइल राडा झाला. उच्च शिक्षण क्षेत्रात सध्या या राड्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील कोहिनूर शिक्षण संस्था या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेचे खुलताबाद येथे शासन अनुदानित कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. नित्यनियमाप्रमाणे महाविद्यालयाकडून विभागीय सहसंचालक कार्यालयाकडे डिसेंबर महिन्याच्या वेतन अनुदानाची मागणी करण्यात आली. महाविद्यालयाच्या मागणीप्रमाणे सहसंचालक कार्यालयाने डिसेंबर महिन्याच्या वेतन अनुदानापोटी ८८ लाख ९१ हजार ४२५ रुपये वेतन अनुदान महाविद्यालयाच्या बँक खात्यावर १ जानेवारी २०२५ रोजीच हस्तांतरित केले.

हेही वाचाः PET-2024 मध्ये गुणवाढ घोटाळा?, ‘ग्रिव्हन्स’मध्ये समाजकार्य विषयात ६३ हून अधिक परीक्षार्थ्यांचे वाढले ८ ते २४ गुण; नापासही झाले पास!

शासनाकडून प्राप्त झालेले वेतन अनुदान अशासकीय अनुदानित महाविद्यालयांनी तीन कार्य दिवसांत संबंधित शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करणे बंधनकारक असताना कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने ते तसेच दाबून ठेवले आणि १८ जानेवारी रोजी विभागीय सहसंचालकांना पत्र लिहून सर्वच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर महिन्याचे वेतन धनादेशाद्वारे परत करून टाकले.

आमच्या महाविद्यालयातील करमचारी कर्तव्यात कसूर करत आहेत. विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत काही प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महाविद्यालयाच्या अकाऊंट्समध्ये अफरातफर झाल्याचे माझ्या निदर्शनास आले असून अन्य कारणांमुळे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २०२४ महिन्याचे प्राप्त झालेले वेतन शासनास परत करत आहे, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांच्या स्वाक्षरीनिशी दिलेल्या या पत्रात म्हटले आहे. जोपर्यंत संस्था कळवत नाही तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्यात यावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी विभागीय सहसंचालकांना याच पत्राद्वारे सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन परत केले.

प्राध्यापक प्रचंड दहशतीखाली

संस्थेचे १८ जानेवारीचे हे पत्र विभागीय सहसंचालकांना सोमवारी (२० जानेवारी) प्राप्त झाले. वेतन अनुदान अदा करून २० दिवस उटलूनही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्यात आले नाही, हे लक्षात येताच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विभागीय सहसंचालक डॉ. रणजितसिंह निंबाळकर मंगळवारी खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात धडकले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा डॉ. निंबाळकर यांचा इरादा होता. परंतु डॉ. निंबाळकर आल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळताच कोणीही बैठकीला जाऊ नये, असे निरोप संस्थेमार्फत देण्यात आले. त्यामुळे प्रचंड दहशतीखाली असलेले प्राध्यापक महाविद्यालयाच्या गच्चीवर असलेल्या एका हॉलमध्ये जाऊन बसले.

हेही वाचाः सहायक प्राध्यापकदासाठी ‘नेट/सेट’ अद्यापही अनिवार्यच, यूजीसीच्या अध्यक्षांनी चार नियम सांगत दूर केला गोंधळ!

निंबाळकर धडकले अन् प्राध्यापकांना फुटला कंठ

सर्व प्राध्यापक कुठे आहेत? अशी विचारणा करत डॉ. निंबाळकर त्यांना शोधत शोधत महाविद्यलयाच्या गच्चीवरील ‘त्या’ हॉलमध्ये पोहोचले. त्यांनी प्राध्यापकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही काहीच बोलायला तयार नव्हते. शेवटी त्यांनी कोणा कोणाला वेतनाची गरज आहे? अशी विचारणा केली. तेव्हा तोंडातून एकही शब्द न काढता एक एक करत सर्वच प्राध्यापकांनी हात वर केले आणि मग एका एकाला कंठ फुटण्यास सुरूवात झाली. कोणाच्या वडिलावर पॅरालिसिसचे उपचार सुरू आहेत, कोणाची आई गंभीर आजारी आहे तर कोणाला घर- कारसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरणे गरजेचे आहे, अशी एकेक कारणे त्यांनी सांगण्यास सुरूवात केली.

प्राध्यापकांचे गाऱ्हाणे ऐकून डॉ. निंबाळकर हे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांच्या कक्षात पोहोचले. शासनाकडून प्राप्त झालेले वेतन अनुदान आजवर कर्मचाऱ्यांना अदा का करण्यात आले नाही? अशी विचारणा त्यांनी त्यांच्याकडे केली. त्याचदरम्यान कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान, सचिव डॉ. आस्मा खान व सहसचिव डॉ. मकसूद खान महाविद्यालयात धडकले. ‘तुम्ही इथे कसे काय आलात?’ असे म्हणत त्यांनी प्रारंभी डॉ. निंबाळकरांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर तुमचा माझा संबंध नाही. प्राचार्य माझ्या थेट अधिपत्याखाली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन का केले नाही, ही विचारणा करण्यासाठी मी आलो आहे, असे डॉ. निंबाळकर म्हणाले.

ये ‘जमीन’ तुम्हारी नही हैं…

 तरीही डॉ. मोहम्मद मझहर खान  थांबले नाहीत. ‘तुम्ही दलाली करण्यासाठी इथे आला आहात का?, तुम्ही भाजपचे आहात का, अल्पसंख्याक दर्जा असलेल्या संस्थाचालकांना धमकावता का? तुम्ही ज्या जागेवर उभे आहेत ती जमीन माझी आहे,’ असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मझहर खान यांनी चढ्या आवाजात डॉ. निंबाळकरांना सुनावण्याचा आणि दमात घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉ. निंबाळकर यांनीही आवाज चढवला आणि नीट बोला. ही तुमची खासगी मालमत्ता नाही. अल्पसंख्यांक दर्जा असला तरी ही सार्वजनिक विश्वस्त संस्था आहे, हे लक्षात ठेवा आणि मला पुढची कारवाई करण्यास भाग पाडू नका, हे असे डॉ. निंबाळकर यांनी डॉ. मोहम्मद मझहर खान यांना त्यांच्यापेक्षा दुप्पट चढ्या आवाजात सुनावले.

आधी वारंवार विनंत्या, नंतर दिली तंबी

जोपर्यंत तुम्ही शिक्षक अथवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे निलंबित किंवा बडतर्फ करत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणाचे वेतन थांबवू शकत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून टाका, अशी मी तुम्हाला विनंती करतो, असेही डॉ. निंबाळकरांनी डॉ. मझहर खान यांना सांगितले. डॉ. निंबाळकरांनी सामोपचाराची भूमिका घेत वारंवार विनंत्या करूनही डॉ. मोहम्मद मझहर खान ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे तुम्ही वेतन अदा न करता अडवून ठेवणार असाल तर मला कारवाई करावी लागेल, अशी तंबी डॉ. निंबाळकरांनी दिली. त्यामुळे डॉ. खान चांगलेच वरमले.

वरच्या मजल्यावर निघालेला ‘जाळ’ खाली पोहोचला अन्…

सहसंचालक डॉ. निंबाळकर हे आपली बाजू जोरकसपणे लावून धरत आहेत, हे पाहून एवढा वेळ प्रचंड दहशतीखाली असलेल्या प्राध्यापकांनाही धीर आला. तेवढ्यात संस्थेचे सहसचिव डॉ. मकसूद खान हे वरच्या मजल्यावर गेले आणि वेतनाच्या मुद्द्यावर प्राध्यापकांशी अर्वाच्च भाषेत बोलले. त्यामुळे संतापलेल्या प्राध्यापकाने त्यांच्या कानाखाली चांगलाच जाळ काढला. वरच्या मजल्यावर काढलेल्या जाळाचा आवाज खालच्या मजल्यावर पोहोचला त्यामुळे संस्थेच्या सचिव डॉ. आस्मा यांचा रक्तदाब वाढून त्यांना भोवळ आली तर डॉ. मोहम्मद मझहर खान यांच्याही तोंडचे पाणी पळाले. हे सर्व सुरू असतानाच कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ अदा करा, अशी तंबा देऊन सहसंचालक डॉ. निंबाळकर तिथून निघून आले. कोहिनूर महाविद्यालयात झालेल्या या ‘सिंघम’स्टाइल राड्याची सध्या उच्च शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.

वेतनाचे बँक खाते संयुक्त कसे?

अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अदायगी शासनाकडून वेळेत करूनही संस्थाचालकांकडून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी अडवणूक केली जात होती. त्यामुळे शासनाने २०१८ मध्ये धोरणात्मक निर्णय घेत आहरण व संवितरण अधिकारी म्हणून अशासकीय अनुदानित महाविद्यालयाच्या एकट्या प्राचार्यांच्याच नावे वेतन खाते ठेवण्याचा निर्णय घेतला. तरीही कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वेतन खाते प्राचार्य आणि संस्थेच्या अध्यक्षांच्या संयुक्त नावानेच आहे. शासनाच्या निर्णयाची ही उघड उघड पायमल्ली असूनही सहसंचालक कार्यालयाने यावर अद्याप कोणतीही कारवाई का केली नाही? हा प्रश्नच आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभागात किती महाविद्यालयांची वेतन खाती अजूनही प्राचार्य आणि संस्थाचालकांच्याच संयुक्त नावाने आहेत? याची झाडाझडती घेऊन आता तरी ही खाती फक्त प्राचार्यांच्याच नावे करण्याची गरज यानिमित्ताने बोलून दाखवली जाऊ लागली आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!