पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेकडे कलागुणांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी २४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले हे प्रस्ताव विभागीय मंडळाकडे दाखल करण्यासाठी शाळांनाही मुदतवाढ देण्यात आली असून शाळांनी हे प्रस्ताव ३१ जानेवारीपर्यंत विभागीय मंडळांकडे सादर करावयाचे आहेत.
चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या तसेच शास्त्रीय कला आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण मिळवण्यासाठीचे प्रस्ताव माध्यमिक शाळांकडे दाखल करण्यासाठी १५ डिसेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले हे प्रस्ताव माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळांकडे सादर करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२५ होती. परंतु एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी पत्रकाद्वारे दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान होणार आहे.
आऊट ऑफ टर्न परीक्षा कधी?
यंदा बोर्डाने प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण व श्रेणी ऑनलाइन पद्धतीने भरण्याचे निर्देश माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी आऊट ऑफ टर्न परीक्षा लेखी परीक्षेनंतर एसएससी बोर्डाने कळवलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केली जाणार आहे.