ट्रायचा मोठा निर्णयः आता फक्त व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएससाठी मिळणार वेगळा रिचार्ज प्लॅन, १५ कोटींहून जास्त ग्राहकांचे वाचणार पैसे


नवी दिल्लीः  फक्त व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ देणारे मोबाईल रिचार्ज प्लॅन सुरू करणे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल ऑपरेटर्सना अनिवार्य केले आहे. हे प्लॅन इंटरनेट डेटा एकत्रित करून देऊ नये, असेही ट्रायने मोबाईल ऑपरेटर कंपन्यांना बजावले आहे.

सध्या भारतातील मोबाईल ऑपरेटर्सकडून सर्व रिचार्ज प्लॅनवर इंटरनेट डेटा दिला जात आहे. वयस्कर किंवा ग्रामीण भागातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांना त्यांच्या फोनवर इंटरनेटची आवश्यकता नसतानाही मोबाईल सेवा सुरू ठेवण्यासाठी इंटरनेट डेटासह असलेले रिचार्ज करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. आता ट्रायच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांचे पैसे वाचणार आहेत.

देशातील १५ कोटी ग्राहक अजूनही फिचर फोनचा वापर करतात. या मोबाईल वापरकर्त्यांची मूलभूत गरज ही व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस हीच असते, असे ट्रायने म्हटले आहे. सध्याच्या डेटा ओन्ली स्पेशल टेरिफ व्हाऊचर (एसटीव्ही) आणि बंडल ऑफर रिचार्ज प्लॅन व्यतिरिक्त फक्त व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएससाठी एक वेगळा स्पेशल टेरिफ व्हाऊचर अनिवार्य असेल. व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस ओन्ली रिचार्ज प्लॅन अनिवार्य केल्यामुळे ज्या ग्राहकांना डेटा किंवा इंटरनेटची आवश्यकता नाही, त्यांना पर्याय मिळेल. दूरसंचार कंपन्यांना बंडल ऑफर आणि डेटा ओन्ली रिचार्ज व्हाऊचर देण्याचे स्वातंत्र असेल, असेही ट्रायने म्हटले आहे.

व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस ओन्ली रिचार्ज व्हाऊचरमुळे वयस्कर वापरकर्ते आणि विशेषतः ग्रामीण भागातील वापरकर्त्यांसाठी उपयोगी ठरतील. माहितीच्या अभावामुळे विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध मोबाईल वापरकर्ते डेटा सेवा वापरण्यास कमी इच्छूक असतात. डेटा सेवा वगळल्यामुळे त्यांना स्वस्त रिचार्ज प्लॅन मिळेल, असेही ट्रायने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *