मुंबईः बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मास्टरमाइंड आरोपी वाल्मिक कराड याच्याशी हितसंबंध असल्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी जोर धरू लागली असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक हितसंबंधाचे धडधडीत पुरावेच उघड केले आहेत. वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्यासह अन्य लोकांच्या संयुक्त मालकीच्या ८८ एकर ३४ गुंठे जमिनीचे सातबारा उतारेच त्यांनी उघड केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. वाल्मिक कराडला सरकारमधूनच संरक्षण मिळत असून त्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेतले जात आहे. धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडशी जवळचे संबंध असल्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नुकतीच केली आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर केले जात असलेले आरोप फेटाळून लावत आरोप करण्यामागे राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. बीडमध्ये अनेक जण आपल्यासोबत फोटो काढतात. त्यांना नाही म्हणता येत नाही. तो वैयक्तिक जीवनात काय करतो, याच्याशी आमचा संबंध येत नाही, असे स्पष्टीकरणही धनंजय मुंडे यांनी दिले होते. मात्र आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील हितसंबंधांचे पुरावेच उघड केले आहेत.
‘धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन! हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र. जगमित्र शुगर्सचे ६ सातबारे मी डिजिटली डाऊनलोड केले. ३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे),’ असे ट्विट करत अंजली दमानिया यांनी सातबाराचे सहा उतारेच शेअर केले आहेत.
अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या जगमित्र शुगर्सच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यात धनंजय पंडितराव मुंडे आणि वाल्मिक बाबुराव कराड यांच्यासह अन्य काही लोकांचीही नावे दिसत आहेत. जगमित्र शुगर मिल्स प्रा.लि. द्वारा करिता असे या सातबारावर नोंदवलेले असून हे समाईक क्षेत्र असल्याची नोंदही या सातबारा उताऱ्यावर दिसून येत आहे. अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संयुक्त मालकीची जमीन असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.
एवढे गंभीर गुन्हे असलेला माणूस…
या सातबारा उताऱ्याचे पुरावे शेअर करण्याआधी अंजली दमानिया यांनी आणखी एक ट्विट करून वाल्मिक कराडचा गुन्हेगारी चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी वाल्मिक कराडचेे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य काही राजकीय नेत्यांसोबतची छायाचित्रे शेअर केली आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या १० गुन्ह्यांची यादीच त्यांनी शेअर केली आहे आणि इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नीबरोबर डायरेक्टर कसा? असा सवाल केला आहे.
वाल्मिक कराडवर फक्त परळीत १० वेळा एफआयआर झाले. २३ सेक्शन्स त्यापैकी अनेक सेक्शन्स ३ ते ४ वेळा देखील आहेत. एकूण ४५ सेक्शन्स लागले आहेत. इतके गंभीर गुन्हे असलेला माणूस धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? त्यांना आधी मविआने थारा दिला, आता महायुतीने. बीडमधून खूप फोन आले. खूप दहशत आहे या सगळ्यांची. लोकांनी जगायचे कसे? असे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. अंजली दमानिया यांच्या या दाव्यावर आता धनंजय मुंडे काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.