मुंबईः लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार? याची प्रतीक्षा राज्यातील असंख्य महिला करत असतानाच या महिन्याचा हप्ता आजपासून (२४ डिसेंबर) दोन टप्प्यात मिळण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आजपासून जमा होणारी हप्त्याची रक्कम ही १५०० रुपयेच असणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली आणि राज्यात महायुतीचे सरकार आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हे अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्त्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरूवात होणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात जमा केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २ कोटी ३५ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये प्रमाणे डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बालकल्याण विभागाकडे लाडकी बहीण योजनेचे २५ लाख अर्ज दाखल करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे या अर्जांच्या छानणीची प्रक्रिया राहिली होती. छानणीची ही प्रक्रिया पूर्ण करून या महिलांना डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
२१०० रुपये मिळणार कधी?
विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यामुळे २१०० रुपये हप्त्याची रक्कम नेमकी कधीपासून मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. २१०० रुपये वाढीव हप्त्याच्या रकमेबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही? हे स्पष्ट होईल. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये प्रमाणेच हप्ता जमा केला जाईल.