छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेला परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे धक्कादायक कारण पोस्टमार्टेम अहवालात समोर आले आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाल्याचा दावा परभणी पोलिसांनी केला होता. मात्र परभणी पोलिसांचा हा दावा केवळ ‘बनाव’ असल्याची पोलखोल पोस्टमार्टेम अहवालाने केली आहे. शरीरावरील अनेक जखमांमुळे धक्का बसून सोमनाथचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेम अहवालात म्हटले आहे. आता सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर मृत्यू ओढवण्याइतपत जखमा कशा झाल्या? सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे तर झाला नाही ना? असे गंभीर प्रश्न या पोर्टमार्टेम अहवालामुळे उपस्थित होत आहेत.
परभणी येथे मंगळवारी १० डिसेंबर रोजी स्टेशन रोडवर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या आंबेडकरी समुदायाने बुधवारी ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती.
बंदच्या काळात परभणी शहरात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन राबवत आंबेडकरी समुदायातील २०० च्या आसपास लोकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून अटक केली होती. अटक केलेल्या आंबेडकरी लोकांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप होत असतानाच सोमनाथ सूर्यवंशीच्या पोस्टमार्टेम अहवालाने परभणी पोलिसांचा क्रूर चेहराच समोर आणला आहे.
परभणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या ३५ वर्षीय तरूणाचाही समावेश होता. त्याला आधी दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. न्यायालयीन कोठडीत असतानाच रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झालेला असल्यामुळे न्यायालयाच्या निगराणीत फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिक तपासण्या तसेच सीटी स्कॅन व एमआरआय करूनच सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह परभणीतील सर्वच दलित नेत्यांनी लावून धरली. त्यानुसार रविवारी छत्रपती संभाजीनगर (औऱंगाबाद) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) न्यायालयाच्या निगराणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करण्यात आले.
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचा प्राथमिक अहवाल न्यूजटाऊनच्या हाती आला असून अनेक जखमांमुळे धक्का बसल्यानेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे या पोस्टमार्टेम अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आधी दोन दिवस पोलिस कोठडीत आणि नंतर दोन दिवस न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अमानुष मारहाण केली. त्यामुळेच त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आणि त्या जखमांमुळे धक्का बसून सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टेम अहवालावरून स्पष्ट होत आहे.
या पोस्टमार्टेम अहवालाच्या मृत्यूचे तत्काळ कारण म्हणजेच इमिजिएट कॉजच्या रकान्यात ‘शॉक फॉलोइंगि मल्टिपल इन्जुरिज’ म्हणजेच अनेक जखमांमुळे धक्का बसून सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे या पोस्टमार्टेम अहवालात म्हटले आहे.
काय केला होता परभणी पोलिसांनी बनाव?
सोमनाथ सूर्यवंशीचा छातीत दुखू लागल्यामुळे त्याच्याच मागणीप्रमाणे त्याला जिलहा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सोमवारी सांगण्यात आले होते. म्हणजेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू ह्रदयविकारामुळे झाला, असे भासवण्याचा प्रयत्न परभणी पोलिसांकडून करण्यात आला होता. परंतु घाटी रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक पोस्टमार्टेम अहवालात पोलिसांच्या या बनावाची पोलखोल केली आहे. या पोस्टमार्टेम अहवालामुळे सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा कश्या झाल्या? सोमनाथ सूर्यवंशीला पोलिस कोठडीत असताना मारहाण केल्यामुळे या जखमा झाल्या की न्यायालयीन कोठडीत मारहाण केल्यामुळे झाल्या? असे प्रश्न या पोर्टमार्टेम अहवालामुळे उपस्थित झाले आहेत.