छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला प्रचंड बहुतम मिळाल्यामुळे विरोधकांकडून ईव्हीएमआधारित मतदान प्रक्रियेवरच शंका घेण्यात येत असतानाच आता सर्वसामान्य नागरिकांतून ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवला जाऊ लागला असून बॅलेट पेपरवरच मतदान घेण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (९ डिसेंबर) छत्रपती संभाजीनगरात ईव्हीएमच्या विरोधात दोन आंदोलने होत आहेत.
आंबेडकरी चळवळ व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने उद्या सोमवारी (९ डिसेंबर) सकाळी ११ वाजता ईव्हीएमचे प्रतिकात्मक दहन करण्यात येणार आहे. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस हे ईव्हीएमचे प्रतिकात्मक दहन आंदोलन होईल.
निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा होणाऱ्या गैरवापराबाबत आंबेडकरी चळवळीने नेहमीच आवाज उठविला आहे. सत्ताधारी ईव्हीएमचा दुरुपयोग करून देशातील निवडणुका सहज जिंकत असून हा सर्व प्रकार प्रजासत्ताक भारताला गुलामगिरीकडे नेणारा आहे. या विरोधात देशभर असंतोष पसरला आहे. या हुकुमशाही पद्धतीला विरोध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या प्रतिकात्मक दहनाचे आयोजन करण्यात आल्याचे आंबेडकरी व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ईव्हीएमचे प्रतिकात्मक दहन आंदोलनाबरोबरच सोमवारीच ११ वाजता क्रांती चौकातून ईव्हीएमच्या विरोधात क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मताच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट हटावच्या मागणीसाठी जागृत नागरी कृती समितीच्या वतीने या क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा क्रांती चौकातून निघून विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे.
ईव्हीएमद्वारे आमच्या मताच्या अधिकाराचे झालेले हनन हा आमच्यावर, संविधानावर आणि लोकशाहीवर झालेला संविधानविरोधी शक्तीचा घणाघात आहे. हा घणाघात परतवून लावण्यासाठी ‘ईव्हीएम हटाव, बॅलेट पेपर लाव’च्या मागणीसाठी हा मोर्चा म्हणजे रस्त्यावरची ही जनतेची निर्णायक लढाई आहे, असे जागृत नागरी कृती समितीने म्हटले आहे.
ईव्हीएमचे खरे स्वरूप बाहेर काढण्याच्या मारकडवाडी गावकऱ्यांचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने हाणून पाडला. त्याचा निषेध करण्यासाठी तसेच डॉ. बाबा आढाव यांच्या वयाच्या ९५ व्या वर्षी उपोषणास म्हणजेच त्यांच्या आजन्म चळवळीस पाठिंबा दर्शवण्यासाठी, त्याचप्रमाणे आमच्या जिवापेक्षाही मोलाचा असलेला मताचा अधिकार हिरावून घेणाऱ्या ईव्हीएमला आणि तिच्यावर धांदली करुन विशिष्ट राजकीय पक्षाचा लाभ मिळवून देणाऱ्या मुख्य निवडणूक आयोगाचा, तसेच ईव्हीएम हटविण्यासाठी जनतेची तीव्र मागणी असूनसुद्धा ईव्हीएम हटविण्याचे आदेश न देणारे सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांचाही निषेध करण्यासाठी या क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे जागृत नागरी कृती समितीने म्हटले आहे.
लोकशाही, संविधान आणि मताच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी या लढाईत हजारोच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन प्रा. भारत सिरसाठ, प्रा. मच्छिंद्र गोर्डे, जितेंद्र भवरे आणि संविधान प्रचारक अनंत भवरे यांनी केले आहे.