एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? सस्पेन्स कायम, पण फडणवीसांसोबत ‘इतके’ आमदारही घेणार आज मंत्रिपदाची शपथ?


मुंबईः  महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर बुधवारी सापडले आणि देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. परंतु शपथविधीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतानाही एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स अद्यापही संपलेला नाही. बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदे यांची दोन वेळा भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्यामुळे तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, आज दुपारी होणाऱ्या शपथविधी समारंभात फडणवीसांसह महायुतीचे एकूण २६ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एनडीए शासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री आणि एनडीए-महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेणार आहेत, हे स्पष्ट आहे. परंतु त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे गृहमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्र्यांचाही शपथविधी आझाद मैदानावरच व्हावा, अशी एकनाथ शिंदेंची मागणी आहे. वर्षा बंगल्यावर फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत शिंदे यांनी शिवसेनेसाठी काही खाती आणि संभाव्य मंत्र्यांबाबतही चर्चा केली. मात्र त्यावर काहीही निर्णय झालेला नाही. भाजपच्या वरिष्ठांशी बोलून कळवतो, असे फडणवीसांनी शिंदेंना या बैठकीत सांगितल्याची माहिती आहे.  त्यामुळे आज शपथविधीच्या वेळेपर्यंत म्हणजेच दुपारी तीन वाजेपर्यंत काही हालचाली होतात का? आणि शिंदे हे फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोणाचे किती आमदार होणार मंत्री?

दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना फार वेळ नसल्यामुळे सुरूवातीला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होणार असे सांगितले जात होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार आणि राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार या तिघांव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील काही सदस्यांचाही शपथविधी होणार आहे.

आज होणाऱ्या शपथविधी समारंभात महायुतीतील घटक पक्षांचे किती मंत्री शपथ घेणार हेही समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, आज भाजपचे १२, शिवसेनेचे ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ अशा एकूण २६ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे म्हणतात, गृह देणार नसाल तर अर्थ खाते द्या

एकनाथ शिंदेंनी गृहमंत्रिपदाची मागणी केली आहे. तो भाजप पक्षश्रेष्ठींनी नाकाराला आहे. गृह खाते मिळणार नसल्यास अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्याची मागणी केली आहे. तेही मिळणार नसल्यास मंत्रिमंडळातील सर्वात महत्वाचे दुसऱ्या क्रमांकाचे महसूल खाते मिळावे असा त्यांचा आग्रह आहे. या खात्याबरोबरच नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचीही मागणी त्यांनी केली आहे, असे सांगितले जाते. यावर आता भाजपकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!