मुंबईः मी काहीही ताणून धरलेले नाही. मी नरेंद्र मोदींना फोन करून सांगितले की, सरकार बनवताना माझ्यामुळे कुठलीही अडचण आहे हे मनात आणू नका. तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी जसा अंतिम असतो, तसा तो आम्हालाही अंतिम आहे. एकनाथ शिंदेंची अडचण होणार नाही, हे मोदी आणि अमित शाह यांना सांगितले आहे. तुम्ही तुमचा निर्णय घ्या, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाच्या दिवशी महायुतीची पत्रकार परिषद झाली होती. त्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संयुक्तपणे संबोधित केले होते. त्यानंतर शिंदे यांनी मौन बाळगले होते.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस अशी चर्चा निकालाच्या दिवसापासूनच सुरू झाली. शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याच्या बातम्याही येत होत्या. किमान एक वर्ष तरी आपणाला मुख्यमंत्रिपदी कायम ठेवावे, असा एकनाथ शिंदेंचा आग्रह असून भाजपची त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी नसल्यामुळे सरकार स्थापनेचा मुहूर्त लांबत असल्याचेही सांगितले जात होते. या सर्व पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेताना कोणताही किंतु मनात बाळगू नका, असे मी कालच प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना सांगितले. काल माझा प्रधानमंत्र्यांशी संवाद झाला. सत्ता स्थापन करताना शिवसेनेचे पूर्ण सहकार्य असेल. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो मला मान्य असेल. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप जो निर्णय घेईल, त्याला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्यावर मतांचा वर्षाव झाला तो महायुती सरकारने जे काम केले, जे निर्णय घेतले त्यामुळे झाला आहे. लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ही माझी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. लाडक्या बहिणींनी सावत्र भाऊ कोण ते ओळखले आहे. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मी नाराज वगैरे मुळीच नाही. आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत. लढून काम करणारे लोक आहोत. आम्ही लोकांमध्ये गेलो, घरी बसलो नाही. आम्ही जे काम केले ते मनापासून केले. माझ्या रक्तात शेवटचा थेंब असेपर्यंत मी जनतेसाठी काम करत राहणार आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन गेलो. आम्ही पर्वताप्रमाणे तुमच्या मागे उभा आहोत, असे आम्हाला मोदी आणि अमित शाह यांनी सांगितले होते. आम्हाला त्यांनी मुख्यमंत्रिपद दिले. मी त्या प्रत्येक दिवसाचा, क्षणाचा वापर राज्याच्या हितासाठी केला, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शाह यांचे आभार मानले आहेत.