मुंबईः काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) कार्यकर्त्यांनी आपले काम केले नाही. हिंदुत्ववादी विचारांपासून दूर गेल्याची टीका लोक करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि हिंदुत्वासाठी स्वतंत्रपणे लढा, असा आग्रह शिवसेनेच्या बहुतांश पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे धरला. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या (उबाठा) पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ठाकरे यांनी सर्व उमेदवारांकडून पराभवाची कारणे जाणून घेतली. बहुतांश उमेदवारांनी ईव्हीएमबरोबरच मित्रपक्षांवरही नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि हिंदुत्वासाठी स्वतंत्रपणे लढा, अशी मागणीही बहुतांश उमेदवारांनी केली. त्यावर मित्र पक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा तो नंतर ठरवू, असे उद्धव ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांना सांगितले.
महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ताकदीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होतो. लोकसभेला काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवित झाला. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते आपल्याला मिळत नाहीत. त्यांचे कार्यकर्ते आपले काम करत नाहीत. त्यामुळे हिंदुत्वासाठी स्वतंत्र होऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी या पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंकडे केली.
एका मराठी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक ठिकाणी आम्ही मतदान करवून घेतले. पण ते ईव्हीएममध्ये उमटले नाही, अशी तक्रारही पराभूत उमेदवारांनी केली. त्यावर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक मतदारसंघात ५ टक्के ईव्हीएममधील मतांची फेरतपासणी करता येते. त्यामुळे सर्व उमेदवारांनी शुल्क भरून आपापल्या मतदारसंघातील फेरमतमोजणीसाठी अर्ज द्यावेत, असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी पराभूत उमेदवारांना दिले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत हे यश मिळू शकले नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये झालेली मतांची विभागणी विधानसभेला झाली नाही, असा नाराजीचा सूरही उद्धव ठाकरेंच्या बहुतांश उमेदवारांनी लावला.
पराभूत उमेदवारांनी केलेल्या या मागणीबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भूमिका मांडली. काही उमेदवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदुत्वासाठी वेगळे लढण्याची त्यांची मागणी आहे. मात्र आम्ही महाविकास आघाडीतच राहणार आहोत, असे दानवे म्हणाले.