महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण?, सस्पेन्स आज संपणार; भाजपला बिहार फॉर्म्युला तर शिंदेंना भाजपची ‘एक्सचेंज ऑफर’ अमान्य


मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळून मुख्यमंत्रिपदावरून तिढा निर्माण झाल्यामुळे सत्ता स्थापनेचे घोडे अडले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे याबाबत निर्माण झालेला सस्पेन्स आज संपणार असून आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार फॉर्म्युला लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. तर मुख्यमंत्रिपदाऐवजी भाजपने दिलेले दोन पर्याय अमान्य करत एकनाथ शिंदेंनी नवीन गुगली टाकली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. आपल्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या गेल्यामुळे आपल्यालाच किमान एक वर्षभरासाठी तरी मुख्यमंत्री बनवावे, असा एकनाथ शिंदेंचा आग्रह आहे. बिहारचा फॉर्म्युला महाराष्ट्रातही लागू करावा, अशी शिंदे सेनेची मागणी आहे. परंतु विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १३२ जागा जिंकल्यामुळे भाजपने आपलाच मुख्यमंत्री होईल, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी सांगितले की, सर्वात पहिली बाब म्हणजे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची घोषणा निवडणुकीच्या आधी करण्यात आली होती. महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेला असा कोणताही शब्द दिलेला नव्हता. दुसरे म्हणजे आम्ही बिहारमध्ये जनता दलाशी (युनायटेड) युती यासाठी केली की बिहारमध्ये भाजपचे बस्तान बसले पाहिजे, ते होऊ शकले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात बिहार फॉर्म्युला लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

बिहारमध्ये लागू केलेले मॉडेल महाराष्ट्रासाठी योग्य नाही, असे प्रेम शुक्ला म्हणाले. महाराष्ट्रात असे करण्याचे कोणतेही कारण नाही. कारण आमच्याकडे महाराष्ट्रात भक्कम संघटनात्मक आधार आणि नेतृत्व आहे. निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपने एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपदी कायम ठेवले जाईल, असा कोणताही शब्द दिलेला नव्हता. त्याऐवजी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणुकीच्या निकालाआधारे घेतला जाईल, असे भाजप पक्षश्रेष्ठींनी संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान सांगितलेले आहे, असे शुक्ला म्हणाले.

निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदी कायम ठेवण्याचे आश्वासन भाजपने दिले होते, या शिवसेनेच्या नेत्यांच्या दाव्याचे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे निवडणूक समन्वयक रावसाहेब दानवे यांनीही खंडण केले आहे. मुख्यमंत्री निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन पक्षांनी आधीच आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला आहे. भाजपचे आमदार लवकरच आपल्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडतील, असे दानवे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा यासाठी शिवसेना नेत्यांनी टाकलेला दबाव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आवडलेला नाही. ही बाब शिवसेनेला कळवण्यात आली. त्यामुळे मंगळवारी सकाळी वर्षा निवासस्थानी शिवसेना नेत्यांनी आयोजित केलेले शक्तीप्रदर्शन रद्द करण्यात आले, असे भाजपच्या काही नेत्यांनी सांगितले. एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने सांगितले की, मुख्यमंत्रिपद आमच्याकडेच राहील, असे भाजपने एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे सांगितले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप पक्षश्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबतच्या स्थितीमध्ये बुधवारी स्पष्टता येईल, असे संकेत शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिले आहेत. शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. परंतु ही भेट मैत्रीपूर्ण होती, मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंगसाठी नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदेंची गुगली, मला उपमुख्यमंत्री नको तर…

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदाऐवजी दोन पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून काम करा, आणि दुसरा केंद्रात या आणि महत्वाचे मंत्रिपद घ्या. परंतु शिंदेंना भाजपचे हे पर्याय मान्य नाहीत. ते केंद्रात जाण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या या एक्सचेंज ऑफरवर गुगली टाकली आहे.

 फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मुलग श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा आणि आपली महायुतीचे समन्वयक म्हणून नेमणूक करा, अशी गुगली शिंदेंनी टाकली आहे. त्यावर भाजपकडून अद्याप कोणताही प्रतिसाद दिला गेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *