छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या PET-2024 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील ४ जिल्ह्यांतील ११ परीक्षा केंद्रांवर ३ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, मानव्यविद्या, आंतरविद्याशाखा, व वाणिज्य विद्या शाखा अशा चार विद्या शाखांमध्ये एकूण ४४ विषयांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ११ हजार ४६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार १६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पीएच.डी. च्या ४९७ संशोधन मार्गदर्शकांकडे आजघडीला केवळ १ हजार ५७६ जागा उपलब्ध आहेत. परिणामी इच्छुकांची संख्या मोठी आणि जागांची संख्या मर्यादित असल्यामुळे पेट परीक्षेच्या निकालाची सर्वच परीक्षार्थ्यांना उत्सुकता लागली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत पेट परीक्षेचा निकाल विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्यासोबत बैठक होऊन तांत्रिक बाबींची पूर्तता करून आजच सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान पेट परीक्षेचा निकाला विद्यापीठाच्या https://online.bamu.ac.in/unic/pet-2024/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.
पेट परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकेवर घेण्यात आलेली आहे. विद्यापीठाकडे ओएमआर उत्तरपत्रिका तपासणीची स्वतःची यंत्रणा नाही. त्यामुळे बाह्यस्त्रोताकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्यात आले आहे. या बाह्यस्त्रोताने आज सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत निकाल विद्यापीठाला देतो, असे सांगितलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पेट परीक्षेचा निकाल प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाकडून त्या निकालावर पुढील प्रक्रिया केली जाईल.
पेट परीक्षेचा निकाल प्राप्त होण्यास विलंब लागला तर मात्र आज निकाल प्रसिद्ध होण्याची शक्यता कमी आहे. तो आजच्याऐवजी उद्या (१६ ऑक्टोबर) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.
कसा पहायचा निकाल?
विद्यापीठ प्रशासनाकडून पेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://online.bamu.ac.in/unic/pet-2024/ या संकेतस्थळावर जायचे आहे. या संकेतस्थळाच्या होमपेजवर
PET-2024 Result वर क्लिक करा. येथे विषयनिहाय प्रश्नपत्रिका, आन्सर की आणि निकाल देण्यात आला आहे. तुमचा विषयाच्या लिंकवर क्लिक करा. निकालाची पीडीएफ ओपन होईल. पीडीएफच्या सर्च ऑप्शनमध्ये तुमचा नंबर टाका. एंटर दाबा. तुमचा निकाल पहा.
२. होमपेजवर उजव्या कोपऱ्यात हिरव्या रिव्हर्स स्क्रीनमध्ये दिसणाऱ्या Click here to Register या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या login च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगइन करायचे आहे. Programme Applications या विंडोमध्ये उजव्या कोपऱ्यात तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. तो डाऊनलोड करून घ्या.
प्रश्नपत्रिका आणि अन्सर कीही अपलोड करणार
पेट परीक्षेसाठी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. या प्रश्नपत्रिकेत प्रत्येकी २ गुणांचे एकूण ५० प्रश्न होते. परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी ही प्रश्नपत्रिका देण्यात आली नव्हती. उत्तरपत्रिकेबरोबरच प्रश्नपत्रिकाही जमा करून घेण्यात आली होती. आता पेट परीक्षेच्या निकालाबरोबरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका आणि अन्सर की (Answer Key) अपलोड करण्यात येणार आहे.
आक्षेप नोंदवण्यासाठी ५ दिवसांचा वेळ
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पेट परीक्षेच्या निकालाबरोबरच प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका आणि अन्सर की अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले कुठे चुकले आणि आपण कुठे बरोबर होतो? याची खातरजमा करून घेता येणार आहे. समजा जर एखाद्या प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय बरोबर देऊनही त्या प्रश्नाचे गुण दिले गेले नाहीत, यासारखे अन्य काही आक्षेप असतील तर त्यासाठी विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून पाच दिवसांचा वेळ दिला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी पाच दिवसांचा पुरेसा वेळ देण्यात येत आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत विद्यार्थी त्यांचे आक्षेप विद्यापीठाकडे लेखी स्वरुपात नोंदवू शकतात. त्यानंतर कोणत्याही आक्षेपांची दखल घेतली जाणार नाही, असे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे यांनी न्यूजटाऊनशी बोलताना सांगितले.