आम्ही जरांगे फॅक्टर मायनस केला, आरक्षणाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या बाजूनेः प्रकाश आंबेडकर


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  बेरजेच्या राजकारणातून आम्ही जरांगे फॅक्टर मायनस केला आहे. एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाहीत. मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात आहेत. मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देऊ नये, अशी ओबीसींची मागणी आहे. आम्ही या मागणीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेरजेच्या राजकारणातून आम्ही जरांगे फॅक्टर मायनस केला आहे, असा मोठा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर हे सोमवारी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) आले होते. सुभेदारी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबरोबरच हरियाणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही भूमिका मांडली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही आदिवासी आणि ओबीसींची मोट बांधत आहोत. मोट बांधण्यात नव्वद टक्के यश आले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ही मोट बांधण्यात शंभर टक्के यश येईल. त्यानंतर आम्ही विधानसभेच्या किती जागा लढवणार हे जाहीर करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला होता. परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू जोरकसपणे लावून धरली. आदिवासी आणि ओबीसींच्या बेरजेच्या राजकारणातून जरांगे फॅक्टर तुम्ही मायनस केला आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला.

पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही जरांगे फॅक्टर मायनस केला आहे. एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाहीत. मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरोधात आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही, हे ओबीसी समाजाचे म्हणणे घटनात्मक आणि कायदेशीर आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशी ओबीसींची मागणी आहे आणि आम्ही या मागणीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले.  हरियाणामधील भाजपच्या विजयाचे खरे कारण काँग्रेस-भाजपचे साटेलोटे हेच आहे. हरियाणा निवडणुकीतून दलितांनी काँग्रेसला सावधानतेचा इशारा दिला आहे. काँग्रेस आता बेभरवश्याची झाली आहे. काँग्रेस- भाजपचे अंतर्गत संबंध पाहता आम्ही देखील काँग्रेसला इशारा देत आहोत, असे प्रकाश आंबेडकर म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, चिंदबरम व त्यांचा मुलगा यांच्यासह इतर नेत्याच्या केसेस पतियाला कोर्टात सुरू होणार होत्या. या केसेस प्रलंबित रहाव्यात यासाठी काँग्रेसने आपल्याच पक्षातील दलित कार्यकर्त्यांचा अपमान सुरू केले. त्यामुळे दलित समाजाची ५० टक्के मते भाजपला पडली, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *