मसापच्या निवडणुकीत आरएसएसच्या ‘दांड्या’वर परिवर्तन मंचचा ‘झेंडा’, आंबेडकरवाद्यांचा ‘विद्रोह’ही संघाच्या दावणीला?


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): मराठवाडा साहित्य परिषद अर्थात मसापच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून या निवडणुकीत आरएसएस-भाजपप्रणित परिवर्तन मंच निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत आंबेडकरवादी-परिवर्तनवादी म्हणवल्या जाणाऱ्या काही साहित्यिक-कवींनीही आपला ‘विद्रोह’ आरएसएसच्या दावणीला बांधून ‘परिवर्तन मंच’ची पताका खांद्यावर घेतली आहे. आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक डॉ. सर्जेराव जिगे हे परिवर्तन मंचचे नेतृत्व करत आहेत.

आरएसएस-भाजपने नियोजनबद्ध आखणी करून अनेक क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी क्षेत्रनिहाय मंचांची स्थापना केली आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात ‘विद्यापीठ विकास मंच’च्या नावाखाली आरएसएस-भाजपने महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांतील विविध प्राधिकरणाच्या निवडणुका लढवल्या आणि काही विद्यापीठांची प्राधिकरणे ताब्यातही घेतली आहेत. आता साहित्य क्षेत्रात घुसखोरी करून त्याच्याशी संबंधित संस्था ताब्यात घेण्यासाठी आरएसएस-भाजपने ‘परिवर्तन मंच’ची स्थापना केली आहे. याच परिवर्तन मंचच्या नावाने आरएसएस-भाजप मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत उतरले आहे.

आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक आणि आरएसएस-भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे हे परिवर्तन मंच पॅनलचे प्रमुख आहेत. ते पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख, विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषदेचे अध्यक्ष आहेत.

परिवर्तन विकास मंचने या निवडणुकीत १५ उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या यादीत आंबेडकरवादी विद्रोही साहित्यिक, कवी, प्राध्यापकांची नावे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  परिवर्तन मंचच्या उमेदवारांच्या यादीत सुप्रसिद्ध परिवर्तनवादी विद्रोही कवयित्री म्हणून महाराष्ट्रभर नावलौकिक असलेल्या प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांचेही नाव आहे. प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे.

 परिवर्तन मंचचे दुसरे उमेदवार प्रा. डॉ. सिद्धोधन कांबळे हेही आंबेडकरी कवि, लेखक म्हणून परिचित आहेत. बिलोली तालुक्यातील अर्जापूरच्या पानसरे महाविद्यालयात मराठीचे विभागप्रमुख असलेले डॉ. कांबळे हे प्रवर्तन साहित्य संसदेचे संस्थापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि साप्ताहिक आंबेडकर भारतचे संपादक आहेत.

परिवर्तन मंचचे तिसरे उमेदवार प्रा. डॉ. मोहन सौंदर्य हे वाळूजच्या राजर्षि शाहू महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्यही आहेत. परिवर्तन मंचचे चौथे उमेदवार बबन मोरे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त कवी आणि लेखक आहेत. ते पाली साहित्य, पाली लिपी व साहित्याचे अभ्यासकही आहेत.

आंबेडकरी विचारांचा वारसा सांगत परिवर्तनवादाची पताका खांद्यावर घेऊन मनुवादी व्यवस्थेवर हल्ले चढवणाऱ्या या कवी, लेखक, प्राध्यापकांनी मराठवाडा साहित्य परिषदेवर जाण्यासाठी आरएसएसच्या ‘दांड्या’वर फडकलेल्या परिवर्तन मंचच्या ‘झेंड्या’खाली जाणे पसंत का केले? डॉ. सर्जेराव जिगे हे आरएसएसचे कट्टर स्वयंसेवक आणि आरएसएसप्रणित विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक असल्याचे माहीत असूनही त्यांनी त्यांचे नेतृत्व का स्वीकारले?  तसे करत असताना आपल्या आंबेडकरवाद, परिवर्तनवादाशी असलेल्या वैचारिक बांधिकलीवर आळ घेतला जाऊ शकतो, याची भीती त्यांना वाटली नसले का? की त्यांनी हेतुतः आरएसएसच्या पदराचा आडोसा घेतला? असे सवाल आता केले जाऊ लागले आहेत.

‘मैत्री’च्या आडून केला घात?

आरएसएस-भाजपला देशातील सर्वच क्षेत्रात घुसखोरी करायची आहे, परंतु ती करण्यासाठी त्यांच्याकडे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, ख्यातकिर्त लोकांची वाणवा आहे. त्यामुळे आरएसएसचे स्वयंसेवक त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, ख्यातकिर्त मित्र शोधतात. मैत्रीच्या आडून त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घालून तयार करतात. तसाच काहीसा प्रकार आरएसएस-भाजपने डॉ. सर्जेराव जिगे यांच्या माध्यमातून मराठवाडा साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतानाही केल्याचे दिसू लागले आहे. त्यांनी मराठीचे प्राध्यापक असलेले आंबेडकरवादी प्राध्यापक, कवी, लेखक हेरले आणि परिवर्तन मंचच्या नावाखाली त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. न्यूजटाऊनने काही उमेदवार, प्रचारकांशी केलेल्या चर्चेतून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

…तर ‘मसाप’ची घटना बदलू- डॉ. जिगे

‘मी आरएसएस-भाजपप्रणित विद्यापीठ विकास मंचचा निमंत्रक आहे. पण मसापच्या निवडणुकीत आम्ही मित्र म्हणून उतरलो आहोत. ही निवडणूक जिंकण्यासाठी आरएसएसची कुठे आणि कशी मदत घेता येत असेल तर ती जरूर घेऊ. यंत्रणा वापरू. मसापची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. आम्ही जर निवडून आलो तर मसापच्या घटनेत आवश्यक ते बदल करू’, असे डॉ. सर्जेराव जिगे यांनी न्यूजटाऊनशी बोलताना सांगितले.

पॅनल संघाचे आहे असे सगळेच बोलू लागलेः डॉ. सौंदर्य

आरएसएस-भाजपप्रणित परिवर्तन मंचच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्याची गरज का भासली?  असे न्यूजटाऊनने प्रा. डॉ. मोहन सौंदर्य यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘आम्ही मित्रांनी ही निवडणूक लढवायचे ठरवले. जेव्हा आम्ही हे ठरवले तेव्हा आरएसएस म्हणून कोणी नव्हते. आम्ही उत्स्फूर्तपणे एकत्र आलो. डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. शिवाजी हुसे आणि मी अशा तीन लोकांची पहिली बैठक झाली. सुरूवात आम्ही केली पण नंतर मेजॉरिटी लोक त्यांचे झाले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो असे झाले’.

‘आता त्यांच्यातून बाहेर पडलो तर एकही मत मिळणार नाही कारण आपल्याकडे यंत्रणा नाही. त्यांच्याकडे यंत्रणा आहे. आणि सोबत राहिलो तर आम्ही संघाबरोबर गेलो असे लोक बोलू लागले आहेत. पॅनेल संघाचे आहे असे लोक म्हणत आहेत. त्याची जाणीव मलाही झाली आहे’, असे डॉ. सौंदर्य म्हणाले. ‘तुम्ही म्हणता तसे डॉ. सर्जेराव जिगे यांना पुढे करून मसाप ताब्यात घ्यायचा आरएसएसचा प्लान असू शकतो’, असेही डॉ. सौंदर्य म्हणाले.

…तर स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभारूः डॉ.धबडगे

वाळूजच्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज धबडगे हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नसले तरी परिवर्तन मंचचे हितचिंतक आहेत आणि या पॅनलच्या उमेदवारांचा ते प्रचार करत आहेत. ‘आम्ही मित्र म्हणूनच मसापची ही निवडणूक लढवायचे ठरवले आहे. आता जर ते हे आरएसएसचे पॅनल आहे, असे सांगत असतील तर आम्ही बाहेर पडून आमच्या उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रचारयंत्रणा उभारू. व्यक्तिशः युवराज धबडगे आरएसएस सोबत जाणे कदापिही शक्य नाही, आम्ही संघाच्या गळात अडकणार नाही’, असे प्रा. डॉ. धबडगे यांनी न्यूजटाऊनशी बोलताना सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *