छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांत राडा,पोलिसांचा सौम्य लाठीमार


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यावरून भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकात राडा झाला. आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात हाणामारी झाली.

आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी येऊन घोषणाबाजी सुरू केल्यामुळे ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांनी एकमेकांना भिडत हाणामारी सुरू केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते ऐकायला तयार होत नसल्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

भाजप कार्यकर्ते हे आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलबाहेर घोषणा देत राडा करत असल्याचे कळल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती चिघळण्याची चिन्हे असल्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबण्याची विनंती केली.

विशेष म्हणजे काल रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जळगाव येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विमानतळावर उतरले होते. त्यावेळी त्यांचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाबाहेर आंदोलन केले होते. त्याचा बदला म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत घोषणाबाजी केल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

दानवे म्हणालेः परिस्थितीला पोलिसच जबाबदार

दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना पोलिसांनाच या परिस्थितीला जबाबदार धरले. ‘या परिस्थितीला पोलिसच जबाबदार आहेत. त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी होती, ती त्यांनी घेतली नाही. काल रात्री मी पोलिस आयुक्तांना फोन केला होता. मात्र तरीही त्यांनी दखल घेतली नाही. पोलिसांनी केवळ शिवसेनेच्या (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनाच ताब्यात घेतले आहे. पोलिस भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नाहीत,’ असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *