तुमच्या मुलीच्या मोफत उच्च शिक्षणात काही अडचणी येतायत का? ‘या’ हेल्पलाइन क्रमांकावर करा संपर्क


मुंबई: नवीन शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत काही समस्या असल्‍यास उच्च शिक्षण विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे.    वार्षिक उत्पन्न ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या पालकांच्या मुलींचे पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे, असे पाटील म्हणाले.

या योजनेचा लाभ घेताना विद्यार्थिनींना काही अडचणी आल्यास त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हेल्पलाईन क्रमांक व हेल्प डेस्क सुरू केला आहे. मुलींच्या मोफत उच्चशिक्षणाबाबत काही अडचणी आल्यास किंवा शैक्षणिक संस्थांकडून अडवणूक होत असल्यास 0796134440, 07969134441 या हेल्पलाइन क्रमांकावर आणि  helpdesk.maharashtracet.org  यावर संपर्क करावा. ही हेल्पलाइन कार्यालयीन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कार्यरत आहे.

या योजनेसाठी https://mahadbt.maharashtra.gov. in पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये/तंत्रनिकेतने/सार्वजनिक विद्यापिठे, शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्याक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना वार्षिक शैक्षणिक व परीक्षा शुल्क या योजनेद्वारे १०० टक्के मोफत करण्यात आले आहे.

 भरलेले पैसे परत मिळणार

शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ व त्यापूर्वी ज्या मुलींनी प्रवेश घेतलेला आहे त्या मुली आणि सध्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या मुली अशा सर्व पात्र मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थीनींनी प्रवेशासाठी पैसे भरले असतील त्यांना भरण्यात आलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र मुलींना रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी त्यांचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे गरजेचे आहे.

येथे मिळेल योजनेची सविस्तर माहिती

या योजनेचा अर्ज भरताना काही समस्या आल्यास संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य/नोडल अधिकारी, विभागीय सहसंचालक कार्यालयातील नोडल अधिकारी किंवा महाआयटीच्या पोर्टलवरील Grieviance Section मध्ये नोंद करावी. या योजनेची माहिती महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra. gov.in, उच्च शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://dhepune.gov.in, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ https://www.dtemaharashtra.gov.in, कला संचालनालयाचे https://doa.maharashtra. gov.in या सर्व अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

दोन टप्प्यात मिळणार मंजूर शिष्यवृत्ती

मंजूर शिष्यवृत्ती सत्रनिहाय दोन टप्प्यात बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थीनी पात्र असणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *