पुणेः पुण्यात पावसाने हाहाकार माजवला असून शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असून या काळात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाची परिस्थिती लक्षात घेता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पुढील आदेशापर्यंत पुणे जिल्ह्यातील धोकादायक पर्यटनस्थळे आणि पूल बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. कार्यालये, कंपन्यांच्या ऑफिसेसना शक्यतो वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आज दुपारी १२ वाजेपर्यंत ६५ मिलीमीटर पाऊस झाला. मुळशी धरणाच्या क्षेत्रात सर्वाधिक ४८४ मिलीमीटर पाऊस झाला. पाऊस वाढल्याने खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढली आहे. पुणे महानगर पालिकेचे अग्नीशमन दल यांच्याकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकाळपासून संपर्कात आहेत. नौदलाशी संपर्क साधण्यात आला आहे, असे दिवसे म्हणाले.
खडकवासला धरणातून सध्या १५ हजार क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. आज दुपारी ४ वाजता खडकवासला धरणातून ३५ हजार क्यूसेस पाणी सोडले जाणार आहे. पुणे शहरात महापालिकेने ४०० लोकांना स्थलांतरित केले आहे. जिल्ह्यातील एकाही गावाचा संपर्क तुटलेला नाही. सकाळी जी परिस्थिती उद्भवली होती, ती पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. इंद्रायणीची पाणी पातळी वाढणार आहे. दोन राज्य मार्ग, ५ जिल्हा मार्ग असे एकूण ७ मार्ग बंद करण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
पुणे शहरातील सरकारी कार्यालयांना सुटी नाही. इतर आस्थापनांना आवश्यकतेनुसार सुटी देण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार वर्क फ्रॉम होम करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवसे यांनी केले आहे.
हवामान विभागाने आज पुन्हा पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासांत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षिततेचे उपाय म्हणून पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
बारावीच्या परीक्षार्थींची पुनर्परीक्षा पुन्हा घेणार
दरम्यान, पावसामुळे इयत्ता बारावीच्या पुनर्परीक्षेला पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक्सवर दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्राच्या उच्च माध्यमिक मंडळाची इयत्ता बारावीची पुनर्परीक्षा सध्या सुरु असून राज्यभरातील पावसाची एकूण परिस्थिती लक्षात घेता आज काही परिक्षार्थी परीक्षेसाठी पोहोचू शकणार नाहीत, ही अडचण आपण शिक्षण दीपक केसकर यांना सांगितली असता जे परिक्षार्थी आजच्या पेपरसाठी पोहोचू शकणार नाहीत, अशा परिक्षार्थींसाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
हा निर्णय पुण्यासह राज्यभरासाठी असणार आहे. या संदर्भातील लेखी निर्णय लवकरच प्रसिद्ध होईल. जे परिक्षार्थी पोहोचू शकले नाहीत, त्यांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे.