मुंबई: नागपूर येथील दीक्षाभूमी विकास आराखडा हा दीक्षाभूमी स्मारक समितीने अंतिम केला आहे. त्यासाठी राज्य शासनाने केवळ निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र, त्याठिकाणी होत असलेल्या भूमिगत वाहनतळाला काही जणांचा विरोध होत आहे. लोकभावना विचारात घेऊन या कामाला स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
आमदार डॉ. नितीन राऊत आणि नारायण कुचे यांनी यासंदर्भात सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. दीक्षाभूमी हे संपूर्ण देशासाठीचे स्मारक आहे. तेथील विकासकामे करण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीने विकास आराखडा अंतिम केला आहे. त्यानुसार तेथे कामे सुरू आहेत, असे फडणवीस म्हणाले.
मात्र, अशा विकास कामामध्ये मतमतांतरे असणे योग्य नाही. त्यामुळे याप्रकरणी आंदोलन करणारे आंदोलक आणि स्मारक समिती यांची एकत्रित बैठक घेतली जाईल. तोपर्यंत भूमिगत वाहनतळाच्या कामाला स्थगिती देत आहे. याबाबत, एकत्रित बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.