जालनाः ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे स्पष्ट आश्वासन राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने दिल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके यांनी आज आपले आंदोलन स्थगित केले.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी वडीगोद्री येथे गेले होते. या शिष्टमंडळात छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री होते. या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण स्थगित केले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी आरक्षणात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याविरोधात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे पटवून दिल्यानंतर आणि चर्चेत दोन मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर हाके यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.
बोगस कुणबी नोंदीच्या आधारे बोगस ओबीसी प्रमाणपत्रे देण्यात आली. त्यावर आमच्या हरकती होत्या. त्यावर श्वेतपत्रिका काढावी, अशी आमची मागणी आहे. खोटी कुणबी प्रमाणपत्रे देणारे आणि घेणाऱ्यांविरुद्ध कारवाई करू, असे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे, असे आंदोलन स्थगित केल्यानंतर हाके म्हणाले.
आमच्या दोन मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश यायचा आहे. तो येण्याआगोदर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. बैठक झाल्याशिवाय सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार नाही, असे सरकारने मान्य केले आहे. ज्या सरकारने प्राधान्यक्रमाने प्रमाणपत्रे दिली, त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आता त्यावर विश्वास ठेवणार नाही. बोगस कुणबी नोंदीवर लाखो हरकती नोंदवल्या आहेत. त्या हरकतींची श्वेतपत्रिका मिळत नाही, तोवर हे आंदोलन थांबवणार नाही. वरिष्ठ संयोजन समितीच्या म्हणण्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आलेले आहे. थांबवलेले नाही, असे हाके म्हणाले.
भुजबळांनी वाचून दाखवले सरकारचे पत्रक
तत्पूर्वी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल २१ जून रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत ओबीसी समाजाचे प्रतिनिधीही होते. या बैठकीत झालेले निर्णय छगन भुजबळ यांनी वाचून दाखवले. इतर मागासवर्गीय भटक्या जमातींवर कोणताही अन्याय होणार नाही, तसेच इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता राज्य सरकार घेईल. इतर मगासवर्गीय आणि भटक्या जमातीच्या मागण्यांसदर्भात सरकार गंभीर आणि सकारात्मक आहे. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, अशी आपणास विनंती करतो, असे राज्य सरकारने काढलेले पत्रक छगन भुजबळ यांनी उपोषणस्थळी वाचून दाखवले. त्यानंतर हाके यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली.