मंत्रिमंडळ बैठक सुरू असतानाच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून बीडच्या तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबईः  मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानाच एका तरूणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीमध्ये हा तरूण अडकल्याने त्याचा जीव वाचला आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेला हा तरूण बीड जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते. आपल्या प्रेयसीवर बलात्कार झाला परंतु न्याया मिळत नसल्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले.

मंत्रालयात यापूर्वीही अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात संरक्षक जाळी बसवण्यात आली आहे. याच जाळीमुळे सहाव्या मजल्यावरून उडी मारलेल्या या तरूणाचा जीव वाचला आहे.

प्राप्त माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न केलेला हा तरूण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. बापू नारायण मोकाशी असे या तरूणाचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळीत हा तरूण अडकला.

 पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतले असून उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला रूग्णवाहिकेतून रूग्णालयात नेले जात असताना आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण विचारण्यात आले असता आपल्या प्रेयसीवर बलात्कार झाला असून न्याय मिळत नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.

 तीन वर्षांपूर्वी आपल्या प्रेयसीवर बलात्कार झाला परंतु या प्रकरणात आपल्याला न्याय मिळत नाही, असा त्याचा आरोप आहे. आपल्या प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यावी आणि आपल्याला न्याय मिळावा, असे या ४३ वर्षीय तरूणाचे म्हणणे होते. यासाठीच आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.

 या तरूणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली मात्र मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लावण्यात आलेल्या संरक्षक जाळीत तो अडकला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली नाही. त्याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. या तरूणाने उडी मारल्यानंतर मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यामुळे मंत्रालयात मोठी गर्दी होती. त्यामुळे या तरूणाने सहाव्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे मंत्रालयात काहीकाळ धावपळीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!