अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी ऍल्युमिनियम फॉइल पेपर वापरताय? लगेच टाळा, अन्यथा होऊ शकतो हा गंभीर आजार!

मुंबईः तुम्ही चपात्या किंवा ब्रेड सॅण्डविच अथवा अन्न पदार्थ गुंडाळण्यासाठी ऍल्युमिनियम फॉइल पेपरचा वापर करताय का? करत असाल तर लगेच सावध व्हा. कारण हा पेपर तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. ऍल्युमिनियम फॉइल पेपरच्या वापरामुळे अल्झायमर हा गंभीर आजार होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. संशोधकांना अल्झायमरच्या रुग्णांमध्ये उच्च ऍल्युमिनियमचे प्रमाण आढळून आले आहे.

ऍल्युमिनियम फॉइल पेर बहुतेक स्वयंपाक घरांमध्ये अगदी शंभर टक्के उपलब्ध असतो. विशेषतः ज्यांच्या घरात नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर जाणारे लोक असतील तर अन्नपदार्थ गरम ठेवण्यापासून ते बेकिंगपर्यंत अनेक गोष्टींसाठी ऍल्युमिनियम फॉइल पेपरचा वापर केला जातो. पण या पेपरच्या वापरामुळे अल्झायमर हा गंभीर आजार होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

काही संशोधनात असे आढळून आले आहे की, ऍल्युमिनयम फॉइल पेपर वापरल्यामुळे  अन्नातील ऍल्युमिनियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरातही ऍल्युमिनियमचे जास्त प्रमाण दिसू लागते. एरवी अन्न किंवा अन्नपदार्थांमध्ये ऍल्युमिनियमचे प्रमाण फारच कमी प्रमाणात आढळते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आरोग्याच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी अतिशय मर्यादित प्रमाणातच ऍल्युमिनियमचे सेवन केले पाहिजे. एखाद्या व्यक्तीने त्याच्या वजनानुसार प्रती १ किलोग्र२म वजनावर २ मिलीग्रामपेक्षाही कमी ऍल्युमिनियमचे सेवन केले पाहिजे.

अल्झायमर या आजारात स्मरणशक्ती कमकुवत होते. आपण छोट्या छोट्या गोष्टीही सहजपणे विसरायला लागतो. त्यामुळे तुमच्या मेंदूची शक्तीही क्षीण होत जाते. हा आजार टाळण्यासाठी ऍल्युमिनियम फॉइल पेपरचा वापर टाळून त्याजागी पर्यायी कोणत्या गोष्टी वापरता येऊ शकतात, याबाबत पोषणतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी पाच पर्याय सांगितले आहेत. आपल्याच हाताने जीवाशी खेळण्यापेक्षा हे पाच पर्याय आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आहेत.

हे वापरा पाच पर्याय

  • पार्चमेंट पेपरः बेकिंग किंवा रोस्टिंग करताना पार्चमेंट पेपर हा ऍल्युमिनियम फॉइल पेपर चांगला आणि लोकप्रिय पर्याय आहे. हे उष्णता प्रतिरोधक आणि नॉनस्टिक आहे. अन्न गुंडाळण्यासाठी किंवा बेकिंग शीटस्सच्या अस्तरासाठी ते उत्कृष्ट आहे.
  • बीसवॅक्स रॅपः अन्न गुंडाळण्यासाठी टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्यासारखा म्हणजेच रियूजेबल उत्तम पर्याय आहे. सुती कपड्याला बीसवॅक्सचे कोटिंग करून ते तयार केलेले असते. त्यामुळे ते नैसर्गिकरित्या जलरोधक आणि मोल्ड करण्यायोग्य ठरते.
  • कॉटन आणि लिनेन नॅपकिन्सः जपानी परंपरेतील फुरोशिकीप्रमाणे कॉटन आणि लिनेन नॅपकिन्स अन्न गुंडाळण्यासाठी वापरले जाऊ शकतात. ते पुन्हा वापरण्यायोग्य, धुण्यायोग्य तर आहेतच शिवाय विविध रंग आणि विविध पॅटर्नमध्येही ते उपलब्ध आहेत.
  • केळीची पानेः काही संस्कृतीमध्ये केळीची पाने अन्न शिजवण्यापूर्वी किंवा सर्व्ह करण्यापूर्वी अन्न गुंडाळण्यासाठी वापरली जातात. केळीची पाने बायोडिग्रेडेबल, शाश्वत तर आहेतच शिवाय केळीची पाने अन्नाला एक वेगळी चवही देतात.
  • मलमलचे कापडः ऍल्युमिनियम फॉइल पेपरला मलमलचे कापड हाही एक उत्तम पर्याय आहे.  हे कापडही पुन्हा वापरण्यायोग्य, धुण्यायोग्य आणि शाश्वत पर्याय आहे.

असे असले तरी ऍल्युमिनियम फॉइल पेपरला सर्वोत्तम पर्याय विशिष्ट वापर आणि वैयक्तिक प्राध्यान्य यावर अवलंबून असेल. चला तर मग ट्राय करून बघायला काय हरकत आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!