सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आता वाहन योग्यता प्रमाणपत्राची सक्ती!


नागपूर: नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. वाहन सुस्थितीत असल्याचे वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

सदस्य सचिन अहिर यांनी नाशिक औरंगाबाद मार्गांवरील अपघाताबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती, लक्षवेधीला उत्तर देताना देसाई बोलत होते. खाजगी बसचा अपघात होऊन आगीत काही प्रवाशांचा मृत्यू ही बाब गंभीर आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून वाहन परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याबाबत कडक धोरण राबविणार असून भरारी पथकांची क्षमता वाढ करण्यात येईल. भरारी पथक अधिक कार्यक्षमतेने कार्यरत करणार असून पथकाला लक्षांक देऊन वाहने तपासण्याचे काम करणार आहे. यासाठी परिवहन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कडक देखरेख केली जाईल.

वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये सक्तीचेः प्रवाशांची सुरक्षा आणि महामार्गवरील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी करण्यासाठी २४ तास विशेष तपासणी मोहीम चालू करणार आहे. वाहन सुस्थितीत असल्याचे वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये लावणे बंधनकारक करण्यासाठी नियमावली तयार केली जाईल. हे प्रमाणपत्र लावण्यासाठी सक्तीचे केले जाईल. ऑक्टोबर २०२२ मध्ये विशेष मोहिमेतर्गत वाहनांची तपासणी केली असता ३८८५ वाहनामध्ये विविध दोष आढळले आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.

नवीन बसबाबत निर्णयः परिवहन विभागात साडेपाच हजार वाहने नवीन घेण्यात आली आहेत. काही डिझेलवरील वाहने सीएनजीवर केली आहेत. तसेच जुन्या आणि वापरास योग्य नसलेल्या एसटी बस नवीन घेण्यासाठी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

खासगी बसेसना दीडपट दरवाढीस परवानगीः विविध सुटीच्या कालावधीत खाजगी बसला दीडपट दरवाढ करण्यास मान्यता आहे. मात्र यापेक्षाही जादा दर खाजगी बस घेत असतील तर उपप्रादेशिक परिवहन कारवाई करतील, असेही त्यांनी एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य विक्रम काळे, अरुण लाड यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!