सहायक प्राध्यापक भरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू, २ हजार ८८ पदे भरण्याचा मार्ग मोकळा


नागपूर: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सहायक प्राध्यापक संवर्गातील भरतीसाठी वित्त विभागाने ४० टक्के पदांना मान्यता दिली आहे. त्यानुसार पद भरतीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. संस्था, महाविद्यालयस्तरावर सहायक प्राध्यापकाची २ हजार ८८ पदे भरण्यात येणार आहेत.

सहायक प्राध्यापक भरतीबाबत सदस्य महादेव जानकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना पाटील बोलत होते.  सहायक प्राध्यापकांच्या ३ हजार ५८० पदांना उच्चस्तरीय समितीने स्थगिती उठवून मंजुरी दिलेली आहे. यातील १ हजार ४९२ पदे भरण्यात आलेली आहेत. शिवाय २१९ पदांच्या भरतीस शासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे.

संस्था, महाविद्यालयस्तरावरून विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून पद भरतीची कारवाई सुरू आहे. २ हजार ८८ सहायक प्राध्यापक यांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथील केले असून ही भरतीही लवकरच केली जाईल. यामध्ये सेट, नेट, पीएचडी, एम. फील. झालेल्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

जानेवारीत शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक पदाची मान्यता घेऊन १०० टक्के पदभरती प्रक्रिया राबवू, असेही पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तासिका तत्वावरील प्राध्यापक यांच्या मानधनात वाढ करुन ६५० रुपये केले आहे. त्यांचे मानधन वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य आमदार एकनाथ खडसे, विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!