महाराष्ट्रावर पुन्हा ‘अवकाळी’ संकट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह राज्यभर मुसळधार पावसाचा अंदाज


मुंबईः गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकुळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असतानाच आता हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या बळीराजावर पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा धोका घोंगावू लागला आहे.

 भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रविवारनंतर राज्यात ढगाळस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी मराठवाड्यासह उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि विदर्भांतील काही जिल्ह्यांत वातावरण अशंतः ढगाळ राहील. तुरळ ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.गुरूवारी ढगाळ वातावरण आणखी गडद होईल आणि काही ठिकाणी पाऊस होईल.

१६ आणि १७ मार्च रोजी संपूर्ण राज्यात ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

उत्तर भारतातील पर्वरांगा तसेच हिमालयात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम हवामानावर होत असल्यामुळे पुढील आठवडाभर राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेगही ताशी ३० ते ४० किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता आहे.

 याआधी होळी आणि धुळवडीच्या दिवशी झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या रब्बी हंगामातील पिकांबरोबरच फळ बागायतींचेही या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

आता पुढील आठवड्यातही ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे शेतीमध्ये उभे असलेल्या उरल्या सुरल्या पिकाचीही नासाडी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालाची काळजी घ्यावी, असा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!